
२ दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यभर धुळवड साजरी करण्यात आली. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मात्र, त्यानंतर आलेल्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. घाटकोपर पूर्वेला असणाऱ्या कुकरेजा पॅलेसमध्ये एका दाम्पत्याचा संशयास्पद मृतदेह आढळून आला. त्यांचे नाव दीपक शाह आणि टीना शाह असे होते. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
७ मार्चला धूळवडी दिवशी दोघेही धुळवड खेळून दुपारी घरी आले. दुसऱ्या दिवशी मोलकरीण घर कामासाठी आली असता त्यांचा दरवाजा बंद होता. दरवाजा ठोठावला तरी त्यांनी उत्तर दिले नाही. ही गोष्ट तिने शेजारी राहणाऱ्या लोकांच्या निदर्शनास आणून दिली. त्या दोघांच्या नातेवाईकांनाही कळवण्यात आले. ते आल्यानंतर शेजारच्यांकडे असणाऱ्या चवीने दरवाजा उघडला आणि सर्वांनाच धक्का बसला.
बाथरूमच्या शॉवरखाली दोघेही पडले होते आणि शॉवरही चालूच होता. पोलिसांना यासंदर्भात कळविण्यात आले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा आधीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, त्यांच्या शरीरावर कोणत्याही खुणा किंवा जखमा आढळून आलेल्या नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, गिझर गॅस लिकेजमुळे गुदमरून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.