वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन

वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन

दूरदर्शनच्या सह्याद्रीवरील सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक आणि सूत्रसंचालक प्रदीप भिडे यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते ६५ वर्षांचे होते. प्रदीप भिडे यांनी आपल्या बहारदार आवाजाने वृत्तनिवेदन क्षेत्रात ४० वर्षे अधिराज्य केले.

दूरदर्शनचा चेहरा ठरलेले प्रदीप भिडे यांनी आपल्या भारदस्त आवाजातून वेगळी ओळख निर्माण केली होती. विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर प्रदीप भिडे यांनी रानडे इन्स्टिट्यूटमधून पत्रकारितेची पदवी घेतली. त्यानंतर ई मर्क आणि हिंदुस्थान लिवर या बहुराष्ट्रीय कंपन्यात काही काळ जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई दूरदर्शन केंद्रात वृत्तनिवेदक म्हणून काम पाहिले. भारदस्त आवाजाच्या जोरावर ते महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले.

मुंबई दूरदर्शन केंद्रात प्रदीप भिडे एप्रिल १९७४ पासून दाखल झाले. वयाच्या २१व्या वर्षी भिडे यांनी बातम्या द्यायला सुरुवात केली होती. दूरदर्शनच्या वृत्तविभागामधे अनुवादक म्हणून त्यांनी काम सुरू केले. सुरुवातीपासूनच मराठी वाङ्मय, नाटके, कादंबऱ्या, एकांकिका या विषयांमधे त्यांना विशेष रुची होती.

१९९३च्या मुंबई बॉम्बस्फोटाची बातमी वाचल्यानंतर ‘आपला आवाज आमचं काळीज चिरत गेला’, अशा प्रतिक्रिया भिडे यांना मिळाल्या होत्या. प्रदीप भिडे यांनी रत्नाकर मतकरी यांच्या संस्थेत काही काळ प्रायोगिक नाटकांमध्येही काम केले होते. भिडे यांनी पाच हजारांहून अधिक जाहिराती, माहितीपट आणि लघुपट यांना आवाज दिला. दोन हजारांहून अधिक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन आणि निवेदन केले आहे. ‘प्रदीप भिडे कम्युनिकेशन’ या नावाने ध्वनिमुद्रण स्टुडिओ निर्मिती संस्था सुरू केली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in