मार्च १९९३ मध्ये मुंबई शहरात झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिकांसह देशात देशविघातक कारवाया करुन पाकिस्तानाच्या आश्रयाला गेलेला दाऊद इब्राहिम याच्याविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने आता विशेष मोहीम हाती घेतली आहे. दाऊदसह त्याच्या सहकाऱ्यांच्या अटकेसाठी एनआयएने बक्षिसाची घोषणा केली असून त्यात दाऊद इब्राहिमवर २५ लाख, छोटा शकीलवर २० लाख, टायगर मेनन, जावेद चिकना आणि अनिस इब्राहिम यांच्यावर प्रत्येकी १५ लाख रुपयांचे बक्षिस जाहीर केले आहे.
अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशिदीच्या पतनानंतर दाऊद इब्राहिमने टायगर मेननच्या मदतीने मुंबई शहरात १२ मार्च १९९३ रोजी बॉम्बस्फोटाची मालिका घडवून आणली होती. या बॉम्बस्फोटापूर्वी ते सर्वजण दुबईमार्गे पाकिस्तानात पळून गेले होते. दाऊदसह त्याच्या सर्व सहकाऱ्यांना सध्या पाकिस्तानात आश्रय मिळाला आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून ते तिथे सुरक्षित आहेत. दुसरीकडे मुंबईतील बॉम्बस्फोटासह देशात घडलेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये दाऊदसोबत आयएसआयचा सहभाग उघडकीस आला होता. या दहशतवादासह नार्को टेररिझम, बनावट नोटा प्रकरणाचा तपास केंद्रीय गृहविभागाने आता एनआयए म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविला आहे. फेब्रुवारी महिन्यांत दाऊदसह त्याच्या इतर सहकाऱ्यांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यानंतर या विभागाने मुंबईसह ठाणे आणि इतर ठिकाणी कारवाई केली होती.
या कारवाईत काही संशयितांना संबंधित अधिकार्यांनी अटक केली होती. एनआयएने दाऊद, त्याचा भाऊ अनिस इब्राहिम, जवळचे सहकारी छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन व इतर सहकाऱ्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तींना बक्षिसाची घोषणा केली आहे. त्यात दाऊद इब्राहिमला सर्वाधिक २५ लाख, छोटा शकीलला २० लाख, टायगर, जावेद आणि अनीससाठी प्रत्येकी पंधरा लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
अतिरेक्यांशी साठगाठ
दाऊद हा भारतात नार्को दहशतवाद, अंडरवर्ल्डच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात हवाला रॅकेट चालवितो, त्याच्याविरुद्ध मनीलाँड्रिंग, मालमत्ता ताब्यात घेणे, बनावट नोटा वितरण करुन देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दाऊदला पाकिस्तान पुरस्कृत लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदासारख्या अतिरेकी संघटनांचा पाठिंबा आहे. त्याच्यासह त्याच्या इतर सहकाऱ्यांचे या संघटनेशी संबंध असल्याचे काही पुरावे एनआयएला प्राप्त झाले आहेत. यापूर्वी संयुक्त राष्ट्रानेही दाऊदसह त्याच्या इतर सहकाऱ्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला बक्षीस जाहीर केले आहे.