
मुंब्र्यात सहा कोटीच्या वसुली प्रकरणात संशय असलेल्या तीन अधिकाऱ्यांसह सात पोलीस निलंबित करण्यात आल्याने ठाणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात आता ‘एनआयए’ची एंट्री होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
फ़ैजल मेमन यांच्या घरात आढळलेले ३० कोटी रुपये हवालामार्फत आले होते आणि त्याचा उपयोग देशविघातक कामासाठी होणार असल्याचा संशय पोलिसांना असल्याने या प्रकरणाच्या तपासात त्यावर भर देण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात एका राजकीय नेत्याचे नाव चर्चेत असल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
शेख इब्राहिम पाशा यांनी पोलीस आयुक्त जगजीत सिंग यांना पाठवलेल्या पत्रात, दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी रात्री बारा ते साडेबारादरम्यान मुंब्रा पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखा निरीक्षक गीताराम शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे, पोलीस उपनिरीक्षक मदने आणि आणखी तीन खासगी व्यक्ती मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनीमधील फैजल मेमन यांच्या घरी धाड टाकण्यासाठी गेले. पोलिसांनी घातलेल्या धाडीमध्ये मेमन यांच्या घरात ३० कोटी रुपयांची रोकड सापडली. प्रत्येकी १ कोटीप्रमाणे ३० बॉक्समध्ये हे ३० कोटी रुपये बांधून ठेवण्यात आले होते. त्यानंतर हे सर्व पैसे जप्त करून मुंब्रा पोलीस स्टेशन येथे आणले गेले. मुंब्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या दालनामध्ये ३० कोटी असलेले हे ३० बॉक्स ठेवण्यात आले. तिथे मेमन यांना घेऊन गेल्यानंतर मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना धमकावून प्रकरण दाबण्यासाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. मेमन २ कोटी रुपये देण्यास तयार झाले. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी आम्ही २ कोटी यातून काढून घेतो आणि उरलेले तुला परत करतो, असे सांगितले. मात्र, प्रत्यक्षात ३० कोटींमधून ६ कोटी रुपये काढून घेतले आणि उरलेले २४ कोटी रुपये मेमन यांना परत केले,असा या पत्रात आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, हे प्रकरण बाहेर कसे आले याच्याही चर्चा सुरू आहेत. मुळात मेमन याचे पैसे असताना तक्रार करणारे शेख इब्राहिम पाशा हे कोण आहेत? त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून तक्रार केली याबाबतही उलटसुलट चर्चा सुरू आहेत. दरम्यान, मेमन हे खेळण्याचे व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिक असल्याचे सांगण्यात येत असले तरी एवढी मोठी रक्कम त्यांच्या घरी कशी आली, कशासाठी आणली गेली ? याबाबत संशय असताना आता या प्रकरणात एनआयएने तपास सुरू केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
३० कोटी दहशतवादी कारवायांसाठी?
गेल्या काही दिवसात मुंबई आणि परिसरात एनआयएचे छापे सुरू असून मिरा-भाईंदर परिसरातही छापे टाकण्यात आले आहेत. दरम्यान, याचवेळी ३० कोटी रुपये आणि पोलिसांच्या ६ कोटीच्या वसुलीचे प्रकरण उघडकीस आल्याने हे ३० कोटी हवालामार्फत आल्याचा संशय असल्याने एनआयए या प्रकरणाचा तपास आपल्याकडे घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एका राजकीय नेत्याच्या नावाची चर्चा
३० कोटी रुपये हवालामार्फत आले होते, असे सांगण्यात येत असताना आता या प्रकरणात एक राजकीय नेत्याच्या नावाची चर्चा सुरू असल्याने या प्रकरणाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.