
सुमारे २२ लाख रुपयांच्या ड्रग्जसहीत एका नायजेरीयन नागरिकाला वरळी युनिटच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्यांनी अटक केली. ओमोखुले इरोबोर असे या नागरिकाचे नाव असून त्याच्याकडून पोलिसांनी ११० ग्रॅम वजनाचे मेथामफेटामाईन ड्रग्जचा साठा जप्त केला आहे. अटकेनंतर त्याला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
माहीम परिसरात काही विदेशी नागरिक ड्रग्जची खरेदी-विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वरळी युनिटला मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी माहीम रेल्वे स्थानकाजवळील सेनापती बापट मार्गावर साध्या वेशात पाळत ठेवून ओमोखुले या नायजेरीयन नागरिकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ११० ग्रॅम वजनाचे मेथामफेटामाईन ड्रग्ज सापडले. त्याची किंमत सुमारे २२ लाख रुपये आहे.