अमली पदार्थांच्या व्यापारावर नायजेरियन्सचे वर्चस्व

मुंबईत नायजेरियन नागरिक वेगवेगळ्या व्हिसावर येतात. त्यात शिक्षण, वैद्यकीय, काम व पर्यटक व्हिसाचा समावेश असतो.
अमली पदार्थांच्या व्यापारावर नायजेरियन्सचे वर्चस्व

मेघा कुचिक/मुंबई : गेल्या काही वर्षांत नायजेरियन नागरिकांनी मुंबईतील अमली पदार्थांच्या व्यापारावर वर्चस्व मिळवल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. नायजेरियन लोक अवैध व्यापारात गुंतले असून, त्याचा सर्वात मोठा धोका मुंबईतील तरुणांना आहे. तसेच शहरातील पोलीस यंत्रणेला त्यांचे आव्हान निर्माण झाले आहे.

दहा वर्षांपूर्वी नायजेरियन नागरिक मुंबईतील अमली पदार्थ व्यवसायात उतरल्याचे दिसून आले. आता शहरातील ८० ते ९० टक्के नायजेरियन हे गुन्हेगारी व्यवसायाशी संबंधित आहेत. गुन्हेगारीच्या दरात वाढ होत असून शहरातील तरुणांसमोर मोठा धोका निर्माण झाला आहे. पोलिसांकडून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे मात्र, अमली पदार्थांच्या व्यवसायात सध्या किती टोळ्या सक्रिय आहेत, याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही.

मुंबईत नायजेरियन नागरिक वेगवेगळ्या व्हिसावर येतात. त्यात शिक्षण, वैद्यकीय, काम व पर्यटक व्हिसाचा समावेश असतो. शहरात आल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रातील हे नायजेरियन त्यांचे पासपोर्ट नष्ट करतात. ज्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसाठी त्यांना हद्दपार करणे आव्हानात्मक बनते. जेव्हा गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्तींना अटक केली जाते तेव्हा त्यात कायदेशीर गुंतागुंत निर्माण होते. कायदेशीर कारवाई पूर्ण होईपर्यंत त्यांना त्यांच्या मायदेशी परत जाण्यापासून प्रतिबंधित केले जाते. विशेष म्हणजे बहुतांशी नायजेरियन लोक मुंबईच्या बाहेर म्हणजे मीरा रोड, वसई-विरार पट्ट्यात राहणे पसंत करतात. तसेच नवी मुंबईतील उलवे, वाशी व खारघर येथे त्यांनी बस्तान बसवले आहे. तेथे त्यांचा अमली पदार्थांचा व्यवसाय संपूर्ण शहरात करतात.

या व्यक्तींनी बनवलेल्या टोळ्या फसव्या आहेत. त्यामुळे त्यांना ओळखणे आणि पकडणे पोलिसांना कठीण होते. पोलिसांनी सांगितले की, या नायजेरियन नागरिकांनी आपले जाळे नियोजन पद्धतीने विणले असून ते अत्यंत गुप्तपणे कार्यरत असते. ते कोकेन, एमडी, एलएसडी व एमडीएमए हे अमली पदार्थ विकतात. त्यांचे या व्यवसायातील मास्टरमाइंड नायजेरिया किंवा आफ्रिकन देशात बसलेले आहेत. दारिद्र्य, निरक्षरता व बेरोजगारीमुळे हे लोक अमली पदार्थांच्या व्यवसायात ओढले जातात. त्यातून त्यांना सहजपणे पैसे मिळतात.

नायजेरियन्स टोळीत भारतीयांना प्रवेश नाही

या नायजेरियन टोळ्या मुंबईत समुद्र किंवा हवाई मार्गाने व माणसांद्वारे अमली पदार्थ पाठवतात. माणसांच्या शरीराच्या विविध भागात हे अमली पदार्थ टाकले जातात. ते शोधणे जिकीरीचे असते. विशेष म्हणजे, हे लोक त्यांच्या स्थानिक भाषेत व्हॉट्सॲॅप, टेलिग्राम किंवा इन्स्टाग्रामवर संवाद साधतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना त्यांना शोधणे अवघड बनते. ते या व्यवसायात भारतीयांना सामील करून घेत नाही. कारण त्यांचा भारतीयांवर विश्वास नसतो. कारण भारतीय नागरिक हे पोलिसांना कळवतील, असा त्यांचा ठामे विश्वास असतो.

मुंबईच्या तरुणांना धोका

मुंबईच्या अमली पदार्थ व्यापारात नायजेरियन टोळींचे वर्चस्व वाढू लागले आहे. त्याचा धोका मुंबईकर तरुणांना आहे. या मुद्याला तोंड देण्यासाठी स्थानिक व आंतरराष्ट्रीय पोलिसांची मदत आवश्यक आहे. नायजेरियातून येणाऱ्या नागरिकांवर कडक निर्बंध लावणे, जनजागृती करणे त्यातूनच नायजेरियन्सवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. त्यातूनच मुंबईकरांचा सुरक्षितता मिळू शकते.

नायजेरियन महिला तस्करीत आघाडीवर

अमली पदार्थ तस्करीत नायजेरियन महिला आघाडीवर आहेत. काही नायजेरियन पुरुष स्थानिक किंवा मराठी महिलांशी लग्न करतात. त्यामुळे स्थानिक भाषेतून संवाद साधणे सोपे बनते. ऑनलाईन फ्रॉडपासून अमली पदार्थांच्या व्यापाऱ्यात नायजेरियन लोकांनी मोठा जम बसवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in