
मुंबई : उंबर माळी-कसारा स्थानकांदरम्यान पुलावर गर्डर लाँच करण्यात येणार असल्यामुळे शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ५.३० वाजेपर्यंत पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेने घेतलेल्या मेगाब्लॉकसाठी अनेक लोकल व मेल, एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
मध्य रेल्वेच्या ईशान्य विभागात तांत्रिक कामांसाठी टिटवाळा ते कसारा स्थानकांदरम्यान अप व डाउन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी रोड क्रेन वापरून आसनगाव आणि आटगाव स्थानकादरम्यान साइट लेव्हल क्रॉसिंगवर गर्डर टाकण्यात येईल. खडवली ते वाशिंद स्थानकांदरम्यान सिग्नल गॅन्ट्री सुरू करण्यात येईल. कसारा रेल्वे स्थानकात मुंबई रेल्वे विकासाद्वारे ४.५ मीटर रुंद पादचारी पुलाचे गर्डर्स लाँच करण्यात येतील.
या ब्लॉकदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी २२:५० ची लोकल रद्द करण्यात आली आहे. तर कसारा येथून सीएसएमटीसाठी सुटणारी ००:१५ ची लोकल रद्द करण्यात आली आहे. कल्याण येथून सुटणारी ५.२८ ची आसनगाव लोकल तसेच ६.०३ वाजताची लोकल रद्द राहील. कसाराहून सुटणारी ०३:५१ ची आणि ४.५९ ची लोकल रद्द राहील. या ब्लॉक कालावधीत टिटवाळा ते कसारादरम्यान उपनगरीय लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत.
लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार!
मध्य रेल्वेच्या कसारा-टिटवाळादरम्यान शनिवारी रात्री घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या गाड्या उशिराने धावणार आहेत. गोंदिया-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विदर्भ एक्स्प्रेस २८ ऑक्टोबर रोजी गोंदिया येथून ३ तास उशिराने सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस-पाटलीपुत्र एक्स्प्रेस सकाळी ४ वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अमृतसर एक्स्प्रेस सकाळी ४.१० वाजता सुटेल.
रविवारी मेन लाईनवर नो ब्लॉक!
या ब्लॉकमुळे रविवार २९ ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-कल्याण विभागादरम्यान मेन लाईनवर मेगाब्लॉक रद्द करण्यात आल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.