मुंबई : बृहन्मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत मनपा शाळांच्या अनेक इमारतीमध्ये सायंकाळी सहा ते आठ या वेळेत रात्र अभ्यासिका वर्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आर/मध्य विभागातील आठ शाळांमध्ये रात्र अभ्यासिका वर्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये पोयसर क्र. २ मनपा शाळा, राजेंद्रनगर मनपा शाळा, दत्तपाडा मनपा शाळा, शिंपवली मराठी मनपा शाळा, एक्सर तळेपाखाडी मनपा शाळा, बाभई मनपा शाळा, राजडा मनपा शाळा आणि चिकूवाडी सीबीएसई या शाळांमध्ये तळमजल्यावर या रात्र अभ्यासिका वर्गाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या अभ्यासिका वर्गात नववी व दहावी इयत्तेत शिकणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांच्या घरी पर्याप्त जागा- सुविधा उपलब्ध नसल्याने, हे वंचित विद्यार्थी या रात्र अभ्यासिका वर्गाचा लाभ घेऊ शकतील. समाजातील जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांनी या विनामूल्य असलेल्या योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन महापालिका उपशिक्षणाधिकारी( पश्चिम उपनगरे) निसार खान, अधिक्षिका दीपिका पाटील आणि आर/ मध्य विभागाच्या प्रशासकीय अधिकारी (शाळा) अस्मिता कासले आदी अधिकाऱ्यांनी केले आहे.