परब फिटनेसचा निलेश रेमजे ठरला ‘मुंबई श्री’चा मानकरी; अंधेरीत रंगलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद; महिलांमध्ये रेखा शिंदेची बाजी

परब फिटनेसच्या निलेश रेमजेने आजवर एकही स्पर्धा जिंकली नव्हती. गटविजेतेपद जिंकण्याचे प्रयत्न नेहमीच अपयशी ठरत होते.
परब फिटनेसचा निलेश रेमजे ठरला ‘मुंबई श्री’चा मानकरी; अंधेरीत रंगलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेला चाहत्यांचा उदंड प्रतिसाद; महिलांमध्ये रेखा शिंदेची बाजी
Published on

मुंबई : परब फिटनेसच्या निलेश रेमजेने आजवर एकही स्पर्धा जिंकली नव्हती. गटविजेतेपद जिंकण्याचे प्रयत्न नेहमीच अपयशी ठरत होते. तरीही कधी हार मानली नाही. स्पर्धा खेळण्याचे प्रयत्न सोडले नाहीत. अखेर गेले आठ वर्षे करत असलेली मेहनत मुंबई शरीरसौष्ठवची खरी शान असलेल्या ‘मुंबई श्री’ स्पर्धेत फळास आली आणि प्रथमच मुंबई श्रीच्या मंचावर उतरलेल्या निलेशने संधीचे सोने केले. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत बॉडी फिट जिमच्या रेखा शिंदेने अपेक्षेप्रमाणे बाजी मारली.

मुंबई शरीरसौष्ठवाची खरी श्रीमंती ज्या स्पर्धेत मंचावर उतरते, त्या मानाच्या प्रतिष्ठेचा ‘मुंबई श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धेचा पीळदार सोहळा बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटनेने संयुक्तपणे पुन्हा एकदा जोशपूर्ण वातावरण अंधेरीच्या लोखंडवाला गार्डनमध्ये पार पाडला. साऱ्‍यांनाच उत्सुकता होती ती मुंबई श्रीचा नवा विजेता कोण असणार आणि या ग्लॅमरस स्पर्धेला निलेश रेमजेच्या रूपाने नवाकोरा विजेता लाभला.

निलेशने गणेश उपाध्याय, संजय प्रजापती, अभिषेक माशेलकर या तगड्या स्थितीत असलेल्या खेळाडूंवर मात करत जेतेपदाला मिठी मारली. या मोसमात निलेश चक्क १६ स्पर्धा खेळला होता आणि फक्त एका स्पर्धेत त्याने गटविजेतेपद मिळवले होते. निलेशने आपल्या आठ वर्षांच्या शरीरसौष्ठव कारकीर्दीत पहिलेच जेतेपद जिंकले. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत रेखा शिंदेला कुणीच आव्हान देऊ शकला नाही. तिने अपेक्षेप्रमाणे ‘मुंबई श्री’वर पुन्हा आपलेच नाव कोरले.

स्पर्धेचा पारितोषिक सोहळा माजी खासदार गजानन कीर्तीकर, आमदार हारून खान, मुंबई शरीरसौष्ठवाचे आजीवन अध्यक्ष अमोल कीर्तीकर, अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत, मुंबई उपनगर शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष किट्टी फनसेका, सरचिटणीस विशाल परब, सुनील शेगडे यांच्यासह शरीरसौष्ठव क्षेत्रातील दिग्गज शाम रहाटे, सागर कातुर्डे, हरमीत सिंग, उमेश गुप्ता आणि विक्रांत देसाई यांच्या उपस्थितीत पार पडला. एकंदर या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला.

logo
marathi.freepressjournal.in