निलेशची निवृत्ती मागे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर निर्णय

कार्यकर्त्यांच्या भावना नेते जाणून घेत नसल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतला होता
निलेशची निवृत्ती मागे देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चेनंतर निर्णय

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर रत्नागिरी-सिंधुदुर्गचे माजी खासदार निलेश राणे यांनी २४ तासात सक्रिय राजकारणातून निवृत्त होण्याच्या निर्णयापासून माघार घेतली. फडणवीस आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निलेश राणे यांनी राजकारणात पुन्हा सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव असलेल्या निलेश राणे यांनी मंगळवारी दसऱ्याच्या मुहूर्तावर सक्रिय राजकारणातून बाजूला होत असल्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आपला हा निर्णय एक्सवरून घोषित केला. निलेश राणे यांच्या या अनपेक्षित निर्णयाने सिंधुदुर्ग भाजपमध्ये खळबळ उडाली होती. या निर्णयानंतर राणे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते. नारायण राणे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, निलेश राणे आपल्या निर्णयावर ठाम होते. राणे समर्थक कार्यकर्तेही या निर्णयामुळे व्यथित झाले होते.

या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांनी सकाळी राणे यांच्या जुहू येथील निवासस्थानी जाऊन निलेश राणे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर रवींद्र चव्हाण हे निलेश यांना घेऊन थेट देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर पोहोचले. याठिकाणी बंद दाराआड झालेल्या चर्चेनंतर निलेश राणे यांनी आपला राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घेत सक्रिय राजकारणात पुन्हा रुजू होण्याची तयारी दर्शविली. फडणवीस यांच्या बंगल्यातून बाहेर पडल्यानंतर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे एकत्रच प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. तेव्हा चव्हाण यांनी निलेश राणे यांच्या नाराजीचे कारण स्पष्ट करत पुन्हा असला प्रकार घडणार नाही, अशी ग्वाही दिली.

‘‘निलेश राणे यांनी काही निर्णय घेतल्याने आमच्यासारख्या प्रत्येकाला नक्की काय घडले, हे कळत नव्हते. नंतर मी नारायण राणे यांच्याशी चर्चा केली. नारायण राणे यांनीही निलेश यांना नक्की काय घडले, ते विचारले. त्यानंतर बुधवारी सकाळी मी निलेश यांच्याशी चर्चा केली. देवेंद्र फडणवीस हे सुद्धा निलेश राणे यांच्याशी बोलले. काही तरी घडले होते, त्यामुळे हे होत असल्याचे आमच्या लक्षात आले. संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येकाला वाटत असते, की कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये. त्यामुळे निलेश राणे यांनी ही भूमिका घेतली होती, असे चव्हाण यांनी सांगितले.

कार्यकर्त्यांवरील अन्यायाने नाराजी

‘‘ज्यावेळी छोटा कार्यकर्ता पक्षात काम करत असतो, त्यावेळी त्याच्या अडचणी सुद्धा वरिष्ठ नेत्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत, हे निलेश यांचे म्हणणे होते. आम्ही आमदार आणि खासदारकीच्या निवडणुकांचाच विचार करत असतो. पण, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत छोट्या कार्यकर्त्यांना लढायचे असते. त्यांचा विचार आमच्याकडून पाहिजे तसा होत नाही. छोट्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घ्यायला हव्यात. त्या न जाणून घेतल्याने निलेश राणे नाराज होते. ते कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे नेते आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना नेते जाणून घेत नसल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतला होता, असा खुलासा रवींद्र चव्हाण यांनी केला.

logo
marathi.freepressjournal.in