नेस्को ड्रग्ज प्रकरण : नवव्या आरोपीला पोलादपूरमधून अटक

गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित संगीत कार्यक्रमात अमली पदार्थांच्या अतिसेवनाने दोन एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी वनराई पोलिसांनी नवव्या आरोपीला अटक केली आहे.
नेस्को ड्रग्ज प्रकरण : नवव्या आरोपीला पोलादपूरमधून अटक
नेस्को ड्रग्ज प्रकरण : नवव्या आरोपीला पोलादपूरमधून अटक
Published on

मेघा कुचिक / मुंबई

गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये आयोजित संगीत कार्यक्रमात अमली पदार्थांच्या अतिसेवनाने दोन एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी वनराई पोलिसांनी नवव्या आरोपीला अटक केली आहे. आयुष साहित्य (२४, रा. उल्हासनगर) असे या आरोपीचे नाव असून, त्याला रायगड पोलिसांच्या मदतीने पोलादपूर येथून ताब्यात घेण्यात आले. तो गोव्याला पळून जाण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली. अमली पदार्थांच्या पुरवठ्याप्रकरणी आरोपी विनीत गैरेलानी आणि आयुष यांच्यात आर्थिक व्यवहार झाल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणातील आरोपींना शनिवारी बोरिवलीतील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आनंद पटेल, विनीत गेरेलानी आणि आयुष साहित्य यांना २० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर विद्यार्थी रौनक खंडेलवाल, आयोजक आकाश सामल, नेस्कोचे कर्मचारी सनी जैन आणि बाळकृष्णन कुरूप तसेच विद्यार्थी प्रतीक पांडे यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

अटक बेकायदा असल्याचा दावा

नेस्कोच्या कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील ऋषी भुता यांनी न्यायालयात अटकेच्या कायदेशीर वैधतेवर आक्षेप घेतला. पोलिसांनी अटकेचे कारण नातेवाईकांना कळवले नाही आणि नोटीस केवळ मराठी भाषेत दिली, जी आरोपींना वाचता येत नाही, असा दावा भुता यांनी केला. हा अटक पूर्णपणे बेकायदेशीर असून याविरोधात सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुनावणीदरम्यान तपास अधिकारी महेश महाले न्यायालयातच बेशुद्ध पडले होते, मात्र उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली.

logo
marathi.freepressjournal.in