हिरानंदानींच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी हजर राहा - छापेमारीनंतर पित्यासह पुत्रालाही ED चे समन्स

दोघेही भारतामध्ये नसल्याने त्यांना ई-मेलद्वारे समन्स पाठविण्यात आले आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याशी (फेमा)संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी हजर राहण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे.
हिरानंदानींच्या अडचणीत वाढ; चौकशीसाठी हजर राहा - छापेमारीनंतर पित्यासह पुत्रालाही ED चे समन्स

मुंबई : बांधकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या हिरानंदानी समूहाचे निरंजन हिरानंदानी आणि त्यांचे पुत्र दर्शन हिरानंदानी यांना परकीय चलन व्यवस्थापन कायद्याशी (फेमा)संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी हजर राहण्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे.

ई-मेलद्वारे हे समन्स बजावण्यात आले असून हिरानंदानी समूहाचा सहभाग असलेल्या परदेशी थेट गुंतवणुकीशी संबंधित दस्तावेजही सादर करण्यास सांगण्यात आले आहे. निरंजन हिरानंदानी यांनी आपण अनिवासी भारतीय असल्याचे म्हटले आहे, तर त्यांचा पुत्र दर्शन गेल्या १४ वर्षांपासून दुबईत वास्तव्याला असून तेथून ते आपला व्यवसाय सांभाळत आहेत. हे दोघेही भारतामध्ये नसल्याने त्यांना ई-मेलद्वारे समन्स पाठविण्यात आले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे टाकून कंपनीच्या व्यवहारांशी संबंधित काही दस्तऐवज हस्तगत केला, परंतु पनवेल आणि चेन्नई येथील परदेशी थेट गुंतवणुकीशी संबंधित फेमाबाबतचा काही दस्तऐवज अद्याप मिळालेला नाही. हे प्रकरण सुमारे १५ वर्षांपूर्वीचे असल्याने जुन्या नोंदी तपास यंत्रणेकडे सुपूर्द करण्यास काही कालावधी लागेल, असे हिरांनंदानी समूहाने एका निवेदनात म्हटले आहे.

पनवेल आणि चेन्नईतील गृहनिर्माण प्रकल्पांसाठी हिरानंदानी समूहाला परदेशी थेट गुंतवणुकीतून ४०० कोटी रुपये मिळाले असे ईडीला फेमा उल्लंघन प्रकरणात आढळून आले. तथापि, रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार या रकमेचा विनियोग या प्रकल्पांसाठी झाला नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

logo
marathi.freepressjournal.in