मी हक्काने बोललो, मी माझ्या वक्तव्यावर ठाम; नितेश राणेंनी 'त्या' वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण

माझ्या विचारांचा सरपंच दिला नाहीतर, मी त्या गावाला निधी देणार नाही, अशी धमकी भाजप आमदार नितेश राणे यांनी दिली होती
मी हक्काने बोललो, मी माझ्या वक्तव्यावर ठाम; नितेश राणेंनी 'त्या' वक्तव्यावर दिले स्पष्टीकरण

काही दिवसांपूर्वी भाजप आमदार नितेश राणे यांनी नांदगावातील ग्रामपंचायत निवडणूक प्रचार सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. 'माझ्या विचारांचा सरपंच दिला नाहीतर, मी त्या गावाला निधी देणार नाही,' अशी सरळ धमकी त्यांनी दिली होती. या वक्तव्यावर ते ठाम असल्याचे सांगता म्हणाले की, "मी काहीही चुकीचे बोललेलो नाही. माझे आणि मतदारांचे अतूट आणि कौटुंबिक नाते आहे. मी हक्काने ते वक्तव्य केले असून या पुढेही जे गाव आमच्या पुरस्कृत पॅनलला निवडून देईल, त्यांच्या गावच्या विकासाची जबाबदारी मी घेणार." असे म्हणत त्यांनी स्पष्टीकरण दिले.

नितेश राणे यांनी, "केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता असताना जर शिवसेना ठाकरे गटाचा सरपंच निवडून आला तर गावाचा विकास होणार कसा?" असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, "खासदार विनायक राऊत हे केंद्रात विरोधक असून ते केंद्राची योजना अथवा निधी कोकणात आणू शकत नाहीत. तर आमदार वैभव नाईक हेदेखील विरोधात आहेत. ग्रामपंचायतींना ग्रामविकास मंत्रालयामार्फत निधी येतो, हे खाते भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे आहे. गाव, शहरांना जोडणारे रस्ते हे रस्ते बांधकाम खात्याकडून होत, हे खाते रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. गावात रस्ते, पाणी, वीज इतर सेवा भाजपच्याच मंत्र्यांच्या माध्यमातून येणार आहेत. तर केंद्राच्याही योजना भाजप सरकारकडूनच येणार आहेत. विरोधी पक्षाचे आमदार निधी आणूच शकत नाहीत."

logo
marathi.freepressjournal.in