नितेश राणेंना जातीवाचक विधान भोवणार

हायकोर्टात याचिका दाखल करून गुन्हा रद्द करण्याची विनंती केली आहे
नितेश राणेंना जातीवाचक विधान भोवणार

मुंबई : प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर बेताल विधान केल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भाजप आमदार नितेश राणे यांनी आता मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. पनवेल सत्र न्यायालयाच्या आदेशानुसादर दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा, अशी विनंती करणारी याचिका त्यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होऊ न शकल्याने नितेश राणेंना तातडीने दिलासा मिळू शकला नाही.

आमदार नितेश राणे यांनी एका पत्रकार परिषदेत दलित शब्द वापरून बौद्ध समाज बांधवांच्या भावना दुखावल्या होत्या. याबाबत अ‍ॅड. अमित कटारनवरे यांनी पनवेल सत्र न्यायालयात तक्रार दाखल केली. या तक्रारीची अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. सी. शिंदे यांनी गंभीर दखल घेत नितेश राणे यांच्याविरुद्ध फौजदारी दंड संहितेच्या कलम १५६ (३) अन्वये गुन्हा दाखल करून तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

सत्र न्यायालयाच्या आदेशा विरोधात नितेश राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल करून गुन्हा रद्द करण्याची विनंती केली आहे. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती नितीन सांब्रे आणि न्यायमूर्ती आर. एन. लड्डा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी निश्‍चित करण्यात आली होती. मात्र याचिकेवर सुनावणी होऊ न शकल्याने राणे यांना तातडीने दिलासा मिळू शकला नाही .

logo
marathi.freepressjournal.in