भारतीय शेअर बाजारात पाचव्या दिवशीही तेजी; सेन्सेक्समध्ये २८४ अंकांनी वाढ

रुपया सावरल्याने आणि विदेशी गुंतवणूक संस्थांकडून खरेदी सुरु झाल्याने तेजीला मदत झाली
भारतीय शेअर बाजारात पाचव्या दिवशीही तेजी; सेन्सेक्समध्ये २८४ अंकांनी वाढ

भारतीय शेअर बाजारात सलग पाचव्या दिवशी - गुरुवारी तेजी राहिली. जागतिक बाजारातील संमिश्र वातावरण असतानाही ऊर्जा, वित्तीय आणि माहिती व तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्याने बाजारात उत्साही वातावरण होते. रुपया सावरल्याने आणि विदेशी गुंतवणूक संस्थांकडून खरेदी सुरु झाल्याने तेजीला मदत झाली.

गुरुवारी सकाळी बाजार उघडल्यानंतर घसरण झाल्यानंतर दिवसअखेरीस ३०-शेअर बीएसई सेन्सेक्स २८४.४२ अंक किंवा ०.५१ टक्का वधारुन ५५,६८१.९५ वर बंद झाला. दिवसभरात त्यात ३४०.९६ अंक किंवा ०.६१ टक्का वाढ होत ५५,७३८.४९ ची कमाल पातळी गाठली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ८४.४० अंक किंवा ०.५१ टक्का वधारुन १६,६०५.२५ वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत इंडस‌्इंड बँकेचा समभाग ७.८८ टक्के वधारला. बँकेने जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत ६०.५ टक्के निव्वळ नफा मिळवल्याचे जाहीर केल्यानंतर समभागात वाढ झाली. त्यापाठोपाठ बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व, एशियन पेंटस‌्, टेक महिंद्रा, लार्सन ॲण्ड टुब्रो, ॲक्सीस बँक आणि पॉवरग्रीड या कंपन्यांच्या समभागात वाढ झाली. तर दुसरीकडे एचडीएफसी बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक आणि डॉ. रेड्डीज यांच्या समभागात १.८९ टक्क्यांपर्यंत घट झाली.

आशियाई बाजारात सेऊल, टोकियोमध्ये वाढ तर शांघायमध्ये घट झाली. युरोपियन बाजारात दुपारपर्यंत संमिश्र वातावरणहोते. दरम्यान, आंतराराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ३.९० टक्के घसरुन प्रति बॅरलचा भाव १०२.८ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी बुधवारी भारतीय भांडवली बाजारात १७८०.९४ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in