

मुंबई : प्रख्यात कलादिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांच्या कर्जत येथील चित्रनगरीची जबाबदारी उचलल्यानंतर राज्य सरकारने आता या चित्रनगरीच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी चित्रनगरीतील १०० निवासी खोल्या, बंगले तसेच अन्य वास्तूंचे नूतनीकरण करण्यासाठी वित्त विभागाने १३ कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे. यापैकी ५९ लाखांचा निधी चित्रनगरीतील तलावाशेजारी संरक्षक भिंत उभारण्यासाठी मंजूर करण्यात आला आहे.
नितीन देसाई यांच्या निधनानंतर सरकारने नोव्हेंबर २०२४मध्ये या चित्रनगरीची जबाबदारी स्वीकारली. सप्टेंबर २०२५ पासून ही चित्रनगरी सरकारच्या अधिपत्याखाली आली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, गोरेगाव यांच्याकडून चित्रनगरीतील नूतनीकरणासंदर्भातची मागणी सरकारकडे करण्यात आली होती. त्यानुसार अंतर्गत निवास व्यवस्थेतील १०० खोल्यांचे नूतनीकरण, वार्षिक देखभाल आणि संरचनात्मक लेखापरीक्षासाठी १३.०३ कोटींचा खर्चाला वित्त विभागाने मान्यता दिली आहे.
स्वर्गीय कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्याकडून कर्जतमध्ये ४६ एकरांवर ही चित्रनगरी उभारण्यात आली आहे. जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, प्रेम रतन धन पायो अशा अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या चित्रनगरीत झाले आहे. शिशमहल, खेडेगाव, परदेशी पर्यटन स्थळांचे देखावे, चित्रपट संग्रहालय या चित्रनगरीत उभारण्यात आले आहे. यामधये १०० निवासी खोल्या आणि छोटेखानी बंगले असून या चित्रनगरीच्या नूतनीकरणासाठी सरकारकडून विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. या चित्रनगरीचा कारभार पाहण्यासाठी सहाय्यक लेखाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशी तीन पदे निर्माण करण्यात आली आहेत.
टप्प्याटप्प्याने नूतनीकरण
सध्या या ठिकाणी काही चित्रपटांचे चित्रीकरण सुरू असून विवाहपूर्व चित्रीकरणासाठी ही चित्रनगरी सध्या आवडते ठिकाण आहे. त्याचप्रमाणे विविध समारंभासाठी सुद्धा भाडेतत्त्वावर सभागृह तसेच निवासी खोल्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने टप्प्याटप्प्याने संपूर्ण चित्रनगरीचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.