हिंदुस्तानचे इन्फ्रास्ट्रक्चर नागरिकांच्या पैशातून उभारणार - मंत्री नितीन गडकरी

कल्याण जनता सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सव सोहळा कल्याणातील अत्रे रंगमंदिरात नुकताच पार पडला
हिंदुस्तानचे इन्फ्रास्ट्रक्चर नागरिकांच्या पैशातून उभारणार - मंत्री नितीन गडकरी

देशातील पायाभूत सुविधाचा विकासकाम करतेवेळी आर्थिक सहाय्यता करण्यासाठी अनेक परकीय संस्था उभ्या असतात. मात्र, भविष्यात हिंदुस्तानचे इन्फ्रास्ट्रक्चर उभारायचे असेल तर नागरिकांच्या पैशातून उभारण्यात येणार असल्याचे रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. कल्याण जनता सहकारी बँकेचा सुवर्ण महोत्सव सोहळा कल्याणातील अत्रे रंगमंदिरात नुकताच पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रम अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत संघचालक डॉ. सतीश मोढ, रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, नवी मुंबई पोस्ट मास्टर जनरल गणेश साळवेश्वरकर, बँकेचे अध्यक्ष सचिन आंबेकर, माजी संचालक मोहन आघारकर, प्रा. अशोक प्रधान, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल खिरवडकर, उपाध्यक्ष डॉ. रत्नाकर फाटक आदी मान्यवर उपस्थित होते.

दरवर्षी पायाभूत सुविधा उभारण्यासाठी ३ लाख कोटी रुपयांची गरज भासते. विदेशातून यासाठी अनेक संस्था अर्थसहाय्य करण्यासाठी इच्छुक आहेत. परंतु, यापुढे त्यांच्याकडून हा पैसा न घेता देशातील निवृत्त व्यक्ती, सफाई कामगार, शिपाई, कॉन्स्टेबल, पत्रकार आदी नोकरदार वर्गाकडून पैसे उभे करण्याची आपली इच्छा आहे. या नागरिकांना ८ टक्के रिटर्न देऊन त्यांच्या पैशातून देशामध्ये हायवे उभारणार असल्याचे गडकरी म्हणाले. तर संपूर्ण ग्लोबल इकॉनोमीमधील राष्ट्र, भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असून त्यांना भारतासोबत आपला व्यवहार करायचा आहे. त्यामुळे आपल्याला महाशक्ती व्हायचे असेल तर तंत्रज्ञानाच्या वापराला कोणताही पर्याय नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच आधुनिकीकरण आणि पाश्चिमात्यकरण हे दोन्ही वेगवेगळे शब्द असून पाश्चिमात्यकरणाचे आपण बिलकुल समर्थन करत नाही. मात्र आधुनिकीकरणाबाबत आवश्यक असणारे सर्व ते परिवर्तन आपण वेळोवेळी केले पाहिजे, असेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.

कल्याण- सामाजिक बांधिलकी जपायची असेल, तर व्यावसायिक भान ठेऊन कायदा न मोडता विकास साधता आला पाहिजे. आनंदी मनुष्य निर्देशांक जपण्यासाठी वाढते प्रदूषण कमी होणे आवश्यक आहे. हे साध्य करण्यासाठी हिरवे इंधन, फ्लेक्स इंजिन, हायड्रोजन, इथेनॉलवर वाहने धावली पाहिजेत. प्रदुषण मुक्तीसाठी येत्या पाच वर्षात इंधनविरहित वाहने रस्त्यावर धावतील, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. विद्युत बस, इंधन वापर कमी करण्याची संकल्पना आहे. बँकांमध्ये विद्युत वाहन खरेदीसाठी कर्ज मागण्यासाठी कोणी आला तर त्याला प्रोत्साहन म्हणून बँकांनी काही सवलत द्यावी, अशी सूचना त्यांनी केली. येत्या काळात बँकांना खासगी बँकांशी आव्हानात्मक स्पर्धा करायची आहे. या स्पर्धेत टिकण्यासाठी बँकांनी बदलते तंत्रज्ञान अवगत करुन सचोटी, प्रामाणिकपणे आपल्या बँकेचे मूळ संस्कार कायम ठेऊन ग्राहक सेवा दिली पाहिजे. कल्याण जनता बँकेने मागील ५० वर्षात बँकेच्या स्थापनेपासून असलेला संचालकी संस्कार कायम ठेऊन सुवर्ण महोत्सवाकडे वाटचाल केली. हीच बँक शताब्दी वाटचाल करेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

यावेळी बँकेचे नाव 'जनता कल्याण सहकरी बँक', असे असायला पाहिजे. बँक कोणत्याही मोबदल्याशिवाय जनतेच्या सेवेसाठी कार्य करते, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष सतीश मोढ यांनी कार्यक्रमावेळी सांगितले. यावेळी बँकेच्या नवीन लोगोचे अनावरण गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. हे लोगो कॅलिग्राफर सुधीप गांधी यांनी साकारला आहे. तसेच बँकेच्या डेबिट कार्डचे देखील अनावरण करण्यात आले. पोस्टाच्या 'माय स्टॅप' योजनेचा शुभारंभ, बँकेच्या टपाल पाकीट सेवेचा अनावर देखील यावेळी करण्यात आले.

पुरस्काराचे वितरण

कल्याण जनता सहकारी बँक लिमिटेड संचालक समाजसेवा पुरस्कार निधी न्यास तर्फे दिला जाणारा 'संचालक समाजसेवा पुरस्कार' दोन पुरस्कार देण्यात आला. पहिला पुरस्कार ऑरो इंजिनियरिंगचे प्रणेते, संरक्षण सामुग्री विकासक, समाजभिमुख व्यवसायिक अशी ओळख असलेले मधु भीमराव हब्बू यांना देण्यात आला. शाल, श्रीफळ, मानचिन्ह व २५ हजारांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यातील हब्बू यांनी मिळालेला पुरस्काराचा धनादेश त्यांनी वनवासी कल्याण आश्रमाला भेट दिली. दुसरा पुरस्कार विद्युत क्षेत्रात 'मिनिलेक', पुष्ठ्भाग लेपण क्षेत्रात 'स्टॅटफील्ड' तसेच अभियांत्रिकी क्षेत्रात इंटेक या उद्यमी आस्थापनाचा समूह 'याशाप्रभा' याचे आधारस्तंभ अमित यशवंत घैसास यांचा सन्मान करण्यात आला. मधुसुधन पाटील यांची मुंबई कोकण विभागातून संचालक पदी नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in