रस्त्याच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नाही; BMC आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश

यंदाचा पावसाळा सुरू होण्‍यापूर्वी म्हणजेच ३१ मे २०२५ पर्यंत दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे रस्ते काँक्रीटीकरणाची कामे वेगाने पूर्ण करा, मात्र ही कामे करताना दर्जा आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही, असे आदेशच पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
रस्त्याच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नाही; BMC आयुक्त भूषण गगराणी यांचे निर्देश
Published on

मुंबई : यंदाचा पावसाळा सुरू होण्‍यापूर्वी म्हणजेच ३१ मे २०२५ पर्यंत दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे रस्ते काँक्रीटीकरणाची कामे वेगाने पूर्ण करा, मात्र ही कामे करताना दर्जा आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड खपवून घेणार नाही, असे आदेशच पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. काँक्रीटीकरणाची कामे हाती घेण्यापूर्वी रस्ते विकासाचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. उपयोगिता सेवा वाहिन्यांसाठी संबंधित यंत्रणांशी समन्वय ठेवावा, असेही गगराणी यांनी म्हटले आहे.

पालिका आयुक्तांनी सिमेंट काँक्रीटीकरण रस्तेकामांचा मंगळवारी आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, प्रमुख अभियंता (रस्ते व वाहतूक) गिरीश निकम यांच्यासह रस्ते व वाहतूक विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महानगरपालिका हद्दीतील सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याच्या उद्देशाने पहिल्या टप्प्यात एकूण ३२४ किलोमीटर (६९८ रस्ते) तर दुसऱ्या टप्प्यात ३७७ किलोमीटर (१४२० रस्‍ते) असे एकूण मिळून ७०१ किलोमीटर रस्ते काँक्रीटीकरण्यासाठी कार्यादेश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये शहर विभाग, पश्चिम उपनगर आणि पूर्व उपनगरातील रस्त्यांचा समावेश आहे.

टप्पा-१ मधील ७५ टक्के कामे आणि टप्पा-२ मधील ५० टक्के कामे ३१ मे २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. महानगरपालिकेने सर्व डांबरी, पेव्हर ब्लॉक रस्त्यांचे काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे बहुतांशी ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. रस्ते विकास करताना खोदकामामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये, विनाकारण खोदकाम करून कामे प्रलंबित राहू नये, याचीदेखील खबरदारी अभियंत्यांनी घेतली पाहिजे. रस्ते विभागातील अभियंत्यांनी विशेषत: दुय्यम अभियंते, सहाय्यक अभियंता यांनी दररोज प्रत्यक्ष कार्यस्थळावर (फिल्ड) गेलेच पाहिजे. नागरिकांच्या सोयीसाठी माहितीफलक, रस्तारोधक (बॅरिकेड्स) लावणे आवश्यक आहे. नवीन कामे हाती घेण्यापूर्वी विद्यमान काँक्रीटीकरण कामे पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास नेणे बंधनकारक आहे, असेदेखील गगराणी यांनी नमूद केले.

अपूर्ण रस्ते प्रथम पूर्ण करावेत - बांगर

सिमेंट काँक्रीट रस्ते बनवण्यासाठी रस्ता खणण्यापासून ते काम पूर्ण होऊन रस्ते वाहतूक सुरू होईपर्यंत साधारणतः ३० ते ४५ दिवसांचा कालावधी, तर उपयोगिता वाहिन्यांच्या कामांचा कालावधी पाहता ७५ दिवसांचा कालावधी जातो. रस्ते विकासाचा प्राधान्यक्रम निश्चित करावा. जो रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे तो रस्ता प्राधान्याने पूर्ण करावा. अपूर्ण अवस्थेतील रस्ते पूर्ण करूनच नवीन काम हाती घ्यावे. कंत्राटदारांनीदेखील एकावेळी अधिक ठिकाणी कामे हाती घेऊन ती वेगाने पूर्णत्वास न्यावीत, अशा सूचना अभिजीत बांगर यांनी यावेळी दिल्या.

logo
marathi.freepressjournal.in