
मुंबई : मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून सीबीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये सन २०२५ -२६ प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. मात्र यंदा शाळेसाठीची जागा अनिश्चित असल्याकारणाने सीबीएससी शाळांच्या संख्येत मात्र वाढ होणार नसल्याचे समजते. सद्यस्थितीत मुंबईत विविध ठिकाणी १८ शाळा सुरू असल्या तरी यात वाढ व्हावी अशी पालकांची मागणी आहे. मात्र यंदा शाळांची वाढ होणार नसल्याची माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.
मुंबईतील चिंचोळ्या गल्लीत लहानशा घरात राहणाऱ्या गरीब आणि कष्टकरी वर्गातील अनेक पालकांचा ओढा आपल्या मुलांनी इंग्रजी शिक्षण घ्यावे याकडे आहे. मुंबई महापालिकेने सुद्धा २०२१ पासून पालिका शाळांचे रूपांतर आपली मुंबई पब्लिक स्कूल म्हणून सीबीएसई आणि अन्य बोर्डांच्या शाळांमध्ये केले आहे. सध्या मुंबईत सीबीएसई बोर्डाच्या १८ शाळा कार्यरत आहेत. या शाळांमधून इंग्रजी माध्यमातून मोफत आणि दर्जेदार शिक्षण दिले जाते.
या शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून गेल्या वर्षी १० हजार ३२७ विद्यार्थ्यांनी नर्सरी ते सहावी दरम्यान प्रवेश घेतला आहे. यामध्ये चिकूवाडी, जनकल्याण, प्रतीक्षा नगर, पूनम नगर, कोरबा मिठागर, हरियाली व्हिलेज, राजावाडी, अजिझ बाग, तुंगा व्हिलेज, भवानी शंकर रोड दादर आणि काणे नगर यासारख्या शाळांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
दोन शाळांसाठी जागेच्या शोधात
सीबीएसई शाळा सुरू करण्यासाठी मुंबई उपनगरात एक आणि शहरात एक अशा दोन शाळांसाठी जागेच्या शोधात पालिका आहे. मात्र अद्याप जागा निश्चित झालेली नाही. त्यासाठी पालिका अनेक संबंधित लोकांशी चर्चा करत आहेत. या चर्चेला कधीपर्यंत यश येईल हे अद्याप स्पष्ट नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईतील गरीब पालकांना पालिकेच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या सीबीएसई बोर्डाच्या १८ शाळांवरच धन्यता मानावे लागणार आहे.