

प्रकाश सावंत/आफ्रिदा अली
मुंबई : माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे नाव लातूरमधून पुसून टाकण्याचा प्रयत्न जसा यशस्वी होणार नाही, तसाच कितीही प्रयत्न केलात तरी मराठी मनावर कोरलेले शिवसेना नाव पुसता येणार नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपसह महायुतीच्या नेत्यांना गुरुवारी ठणकावले.
ख्यातनाम फोटोग्राफर शिवशक्ती-भीमशक्ती युतीचे शिल्पकार आणि मी मुंबईकर संकल्पनेचे जनक, कोविड काळातील महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ‘नवशक्ति-फ्री प्रेस जर्नल’ने संवाद साधला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विविध प्रश्नांना मनमोकळी व दिलखुलास उत्तरे दिली. त्यांच्याशी झालेली बातचीत.
मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढूनही तुम्हाला ८४ जागा मिळाल्या होत्या. तेव्हा तुम्ही महापालिकेत सत्ता स्थापन केली होती. आता तुमच्यासोबत आलेत राज ठाकरे. किती जागा जिंकण्याची अपेक्षा आहे?
मुळात आम्ही एकत्र आलेलो आहोत ते आता महाराष्ट्रात, मुंबईवर आलेले संकट दूर करण्यासाठी. कारण इतकी वर्षे जो यांचा एक छुपा अजेंडा होता मुंबई गिळायचा, तो शिवसेनेमुळे यशस्वी होत नव्हता. शिवसेना होऊ देत नाही आणि आता होऊ देणार नाही. म्हणून सत्ताधाऱ्यांनी काय केले? पहिले शिवसेना नावच पुसण्याचा प्रयत्न केला. पण, मराठी मनावर कोरलेले शिवसेना नाव पुसण्याचा प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही.
भाजपचे कुणी तरी रवींद्र चव्हाण हे लातूरमधून थेट माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची आठवण पुसून टाकायला निघाले. अरे बाबा, आधी तू कोण होतास? काय आहेस? तुझी मानसिकता काय? काय बोलतोस? खरे तर त्याला रितेश देशमुखने चांगले उत्तर दिले आहे. एखादी ओळ लिहिलेली पुसता येते, पण मनावर कोरलेली बाब मुळीच पुसता येणार नाही. आता त्याच भाजपवाल्यांना शिवसेना कागदावर चोरता आली असली तरी लोकांच्या मनातली शिवसेना कशी चोरणार?
याउलट, अंबरनाथमध्ये भाजप-काँग्रेस, एमआयएम यांची जी काही भ्रष्ट युती झालेली आहे, ती काही विटी-दांडू खेळायला झाली आहे काय? अंबरनाथमध्ये शहा सेनेला वापरले आणि फेकले. ‘एसएनशि’ गटाला त्यांनी म्हणजे नुसते आपले पुसून फेकणारे फडके केले आहे.
महाआघाडीतील घटक पक्ष असलेले काँग्रेस, आप तुमच्यापासून दुरावले आहेत, त्याचा कितपत फरक पडेल?
मुळात महाआघाडीत आमचे विलीनीकरण झालेले नाही. त्यामुळे त्याचा फार काही फरक पडेल असे मला वाटत नाही.
महायुतीचे काय?
महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या ‘एसएनशि’ गटाला वापरून पुसून फेकून देण्यात येत आहे. भाजपने अंबरनाथमध्ये काँग्रेस, एमआयएमबरोबर युती करून ‘एसएनशि’ गटाला एकदम कचऱ्यातच फेकले आहे.
मुंबई महापालिकेचा कारभार सध्या कसा चाललाय?
गेल्या चार वर्षांमध्ये मुंबईची बजबजपुरी झालेली आहे? आता मुंबईचा चांगला कारभार करायला कुणी मायबापच राहिलेला नाही. राज्यातील सत्ताधाऱ्यांनी प्रशासकाच्या माध्यमातून मुंबईवर कब्जा मिळवला आहे. मुंबईकरांचे प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवकच नाहीत. त्यामुळे कारभारात कोणतीही पारदर्शकता उरलेली नाही. म्हणूनच एक चांगली मुंबई पुन्हा घडवण्यासाठी राज आणि मी एकत्र आलेलो आहोत. आमच्या वचननाम्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत.
आडवी मुंबई उभी होतेय, लोकसंख्या वाढतेय. त्याचा पायाभूत सेवासुविधांवर असह्य ताण पडतोय.
मुळात या गोष्टी काही एका रात्रीत होणार नाहीत. त्या टप्प्याटप्याने पूर्ण कराव्या लागतील. आम्ही पंचवीस वर्षे तेच केले. म्हणूनच मुंबईकरांनी आमच्या हातात मुंबई दिली. मुख्य म्हणजे याही वेळी देतील. कारण आम्ही केलेली कामे आमच्या माहिती पुस्तिकेत ठळकपणे दिली आहेत. शिवाय, होर्डिंगही लावलेत.
मुंबईकरांना चालायला पदपथ नाहीत. मुंबईतला वाहतूककोंडीचा प्रश्न खूप ज्वलंत झालेला आहे. वाहने वाढली, परंतु त्या तुलनेत प्रत्येक विभागात सार्वजनिक पार्किंगची व्यवस्थाच उपलब्ध नाही.
पार्किंग सोडा. मी मुंबई फिरतोच आहे. तुम्हीही फिरताय. नव्वद टक्के मुंबई खोदलेली आहे. कुठे चालणार तुम्ही? आणि बीएसटी तुम्ही मारताय. बीएसटी सगळ्यात सक्षम बससेवा आणि माफक दरात एवढे स्वस्तात प्रवाशांची सोय करणारी. मला नाही वाटत जगामध्ये दुसरी कोणती सेवा असेल, पण ती त्यांनी मारून टाकली. नको तिकडे मेट्रो केली. आता मेट्रो पण आहे, तरी रस्त्यावरच्या गाड्या तशाच आहेत. म्हणजे मेट्रोचे खांब उभे राहिले. त्याच्यामुळे रस्ते गेले. मेट्रोतून किती लोक येतात-जातात याचा काही अंदाज नाही. मेट्रो आणलीत तर मग शहरातील वाहतूक सुरळीत का होत नाही?
बेस्टचे जे कर्मचारी रिटायर्ड झालेले आहेत त्यांना अजून त्यांची देणीच मिळालेली नाहीत. तुम्हाला काय वाटते?
आता बेस्टचे कर्मचारी आझाद मैदानात उपोषणाला बसलेत. मुंबई महापालिकेचे बजेट आता येईल की नाही याचीच मला भीती वाटतेय. कारण ९२ हजार कोटींच्या ठेवी यांनी तोडून ८० हजार कोटींवर आणल्यात. त्यातच आणखी १७ हजार कोटी तोडणार असं माझ्या कानावर आले आहे. १ जून २०२४ पासून बीएसटीच्या कर्मचाऱ्यांची थकित देणीच दिलेली नाहीत. साधारणतः महापालिका चालते ती या ठेवींच्या व्याजावरती. तथापि, त्या ठेवीच्या माध्यमातून मोठमोठे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. आम्ही कोस्टल रोड केला, पण त्या खर्चाचा आणि जमा होणाऱ्या पैशांचा ताळमेळ घालून. आता त्याचा ताळमेळ न घालता यांनी एफडीवर डल्ला मारला आहे. मुंबईला आणखी खड्ड्यात टाकलेय. हो, मग कोण देणार देणी? पन्नास खोके, एकदम ओके हे झालेय.
मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय ज्वलंत प्रश्न आहे तो वाढत्या प्रदूषणाचा, पर्यावरणाच्या ऱ्हासाचा. तुम्हाला काय वाटते?
वातावरणात प्रदूषण आहे. तसेच, ते राजकीयसुद्धा आहे. तेच मी तुम्हाला सांगणार आहे. प्रदूषणाचा त्रास सगळ्यांनाच होतोय. हिंदूंना पण होतोय, मुसलमानांना पण होतोय. मग, तुम्ही हिंदू, मुस्लीम कशासाठी करताय? हिंदूंना खड्डे लागत नाहीत का? हिंदूंना पाण्याची कमतरता भासत नाही का? हिंदूंना ट्रॅफिक जाम लागत नाही का? हिंदूंना फुटपाथवरून चालायला त्रास होत नाही का? मग या प्रश्नांची उत्तरे का नाही देत तुम्ही? वायू प्रदूषणाबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास हे खरे प्रश्न आहेत.
सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे नसल्याने महिलांना ‘राइट टू पी’सारखी चळवळ उभारावी लागते. हा प्रश्न कसा सोडविणार?
मी मान्य करतो की ज्या सेवासुविधा आहेत, त्या पुरेशा नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे नियोजनशून्य विकास चाललेला आहे. जिथे गरज नाही तिकडे पैसा वापरला जात आहे. आता जी काही रस्त्यांची कामे चालली आहेत, त्याची खरंच एवढी गरज होती का? मेट्रोची कामं काढली, याची खरंच एवढी गरज होती का? त्याच्याऐवजी सत्ताधाऱ्यांनी महिलांना शौचालय द्यायला पाहिजे होते. प्राधान्यक्रम कशाला द्यायचा याची काही एक जाण या राज्यकर्त्यांना नाही. तुम्ही टॉवर्स बांधताय. पण माझ्या गरीब झोपडपट्टीतल्या महिलांसह नागरिकांना टॉयलेट देत नाही ही किती लज्जास्पद गोष्ट आहे. आता सुद्धा तुम्ही बघा, पाठीमागे टॉवर उभे राहिले आहेत. पण तिकडे बेहरामपाडा असेल, भारतनगर असेल. पुनर्विकास अजून चालूच आहे. किती वर्षे झाली? धारावीकरांना थेट देवनारच्या कचरापट्टीवर जागा देणार आहेत. ही वृत्ती आहे ना, त्या वृत्तीच्या विरुद्ध आम्ही एकत्र आलेलो आहोत.
एकेकाळी अडल्या नाडलेल्यांच्या हाकेला धावणाऱ्या शिवसेनेच्या शाखा आणखी ‘चार्ज’ करण्याच्या दृष्टीने काही करणार आहात का?
शिवसेनेच्या शाखा चालू आहेत. फक्त आम्ही आमच्या केलेल्या कामांचा कधी बोभाटा केला नाही. तसेच, दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे श्रेयसुद्धा कधी घेतले नाही. घेत नाही. कारण शिवसेनाप्रमुखांनी जे धोरण सांगितले की ८० टक्के समाजसेवा आणि २० टक्के राजकारण. मुंबईमध्ये कुठे घातपात-अपघात झाला तर धावून जातो तो पहिला शिवसैनिक. या निवडणुकीसाठी थोडेसे एक मायाजाल पसरवले जात आहे. पण हे कोणी मुंबईवर प्रेम करणारे लोक नाहीत. या तिघांपैकी पहिला आपला कार्यकाल संपल्यावर दिल्लीत किंवा नागपुरात जाणार. दुसरा जाणार फाइव्ह स्टार शेतात. तिसरा जाणार काका मला वाचवा म्हणत बारामतीत. मुंबईत कोण राहणार? मुंबईमध्ये राहणार सामान्य शिवसैनिकच. त्याच्यामुळे शिवसेनेची शाखा आणि शिवसेना आहे. रक्तदान करायला कोण जातो? अगदी मुंबईत रक्तदान असेल, हॉस्पिटलमध्ये अॅडमिशन असेल, शाळेत अॅडमिशन असेल, नोकरीचा प्रश्न असेल, कुठे काही कोणाला त्रास होत असेल, तर लोक आजही शिवसेनेच्या शाखेत येतात. गटारे तुंबली, कचरा साठला, तर आपले कपडे सांभाळणारे हे लोक येणार आहेत का?
विद्यापीठाच्या निवडणुकाच जर होणार नसतील, तर तरुण राजकारणात येणार कसे?
विद्यापीठाच्या निवडणुका तर सोडा. निवडणुका लढवायलाच तरुणांनी यावे असे नाही. पण जिथे तुम्ही आता जबरदस्तीने बिनविरोध निवडणुका करून तरुणांचा मतदानाचा अधिकारच मारत असाल तर ते कितपत योग्य आहे? आता जो अठरा वर्षांचा झालाय, त्याला पाच वर्षे मतदानाचा अधिकार मिळणार नाही. मग तो संतापून रस्त्यावर का नाही उतरणार? म्हणून माझे म्हणणे हेच आहे की इकडे जबरदस्तीने बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत, ती प्रक्रियाच रद्द करून फेरनिवडणुका घेण्याची गरज आहे.
देशातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. कामगार अस्वस्थ आहेत. तुम्हाला काय वाटते?
शेतकऱ्यांना अतिरेकी बोलण्यापर्यंत सत्ताधाऱ्यांची मजल गेली आहे. कामगार कायदे बदलले आहेत. याविरुद्ध जनतेनेच आता रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता आहे.
तुमच्या दृष्टीने मुंबईचे व्हिजन काय आहे?
मुंबईचे व्हिजन आम्ही वचननाम्यात दिलेले आहे. आम्ही जे करून दाखविले आहे, तेच या पुस्तिकेत आहे. पुढे काय करणार याचा रोडमॅपही दिला आहे. आम्ही कोरोना काळात जे काम केले, त्याचे जगभर कौतुक झाले, ते मुंबई मॉडेल आम्ही यशस्वी करून दाखविले आहे.
प्रबोधनकार-बाळासाहेब मला सारखेच प्रिय!
प्रश्न थोडा व्यक्तिगत आहे. बाळासाहेब ठाकरे आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यापैकी तुम्हाला अधिक प्रभावशाली विचारांचा कोण वाटतो?
दोघांचे विचार एकच आहेत. आजोबा आणि आजीचे प्रेम मुलापेक्षा नातवंडांवर अधिक असते. त्यामुळेच आम्ही आजोबांचे प्रेम हे जास्त अनुभवले. याचा अर्थ असा नाही की वडिलांनी प्रेम नाही केले. पण तुमचा जो प्रश्न आहे की प्रभावी कोण वाटते? आजोबांनी ' माझी जीवनगाथा' लिहिली त्यातील सगळे अनुभव त्यांनी आम्हाला त्यांच्या शब्दात सांगितलेले आहेत. जे बाळकडू म्हणतात हे अगदी लहानपणापासून आम्हाला मिळायला सुरुवात झाली. त्यानंतर साहजिकच आहे माझी ‘माँ’ हिचे एक व्यक्तिमत्त्व वेगळे होते, तर या सगळ्याचा परिपाक होऊन मी जो काही आहे तो आहे. थोडक्यात काय, बाळासाहेब आणि प्रबोधनकार. जे पटेल ते बोलायचे, जे पटत नाही, त्या ढोंगावरती लाथ मारायची. ही आजोबांची शिकवण आणि आम्हीही तेच करतो. आज सुद्धा भाजपच्या ढोंगावर आम्ही लाथ मारतोय.