मुंबई : मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पनवेल आणि ट्रान्सहार्बर लाईन ठाणे पनवेल दरम्यान हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेतलेला नाही. तर शनिवारी रात्री ते रविवार पहाटे मुख्य मार्गाच्या धीम्या मार्गावर रात्रीचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मुख्य मार्गावर मस्जिद आणि कुर्ला स्थानकांदरम्यान शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४.३० पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून शनिवारी रात्री १२.१४ ते १२.२४ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन स्लो मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यानंतर या गाड्या डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
पश्चिम रेल्वेवर १० तासांचा ब्लॉक
पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव ते कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी ७ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत १० तासांचा मोठा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत अप धीम्या मार्गावरील लोकल बोरिवली ते गोरेगावपर्यंत अप जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल अंधेरीहून डाऊन जलद मार्गावर धावतील. गोरेगाव ते बोरिवली स्थानकांदरम्यान सर्व डाऊन धीम्या मार्गावरील लोकल पाचव्या मार्गावरून धावतील. तर, फलाट उपलब्ध नसल्याने या लोकल राम मंदिर, मालाड आणि कांदिवली स्थानकांवर थांबणार नाहीत.