यापुढे कोणत्याही साखर कारखान्याला हमी नाही! अजित पवारांची विधानसभेत घोषणा

यापुढे कोणत्याही साखर कारखान्याला हमी नाही! 
अजित पवारांची विधानसभेत घोषणा
Published on

विधानसभेत गुरुवारी प्रवीण दरेकर विरुद्ध अजित पवार असा सामना रंगला. प्रवीण दरेकरांवर मुंबै बँक प्रकरणात आरोप झाल्यापासून प्रवीण दरेकर साखर कारखान्यांना टार्गेट करून आरोप करत आहेत. या कारखान्यांना दिलेली कर्जे ही बेकायदेशीर असल्याचा आरोप सतत भाजपकडून होत आहे. गुरुवारीही दरेकरांनी यावरून अजित पवारांना सवाल केले. दरेकरांच्या आरोपांना उत्तर देताना अजित पवार यांनी, यापुढे कोणत्याही साखर कारखान्याला हमी देणार नाही, असे जाहीर केले आहे. तसेच काही कारखाने सरकारने विकत घेतले. त्यातले काही कारखाने बंद आहेत. या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे पैसे देण्यासाठी कर्ज काढले, असे स्पष्टीकरणही अजित पवारांनी यावेळी दिले.

एमएससी बँकेचा नफा निव्वळ ४०० कोटी रुपये आहे, असे दरेकरांना सुनावत ते म्हणाले की, “आम्ही भेदभाव करत नाही. यापुढे कोणत्याही कारखान्याला हमी देणार नाही, सत्ताधारी असो किंवा विरोधक, त्यांच्यावर कारवाई होणारच. सर्व प्रकारचे सहकारी नियम पाळूनच कारखान्यांना मदत करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. आम्ही आज असू अथवा उद्या नसू; परंतु सहकारी संस्था कायमस्वरूपी मजबूत राहिल्या पाहिजेत. मधल्या काळात सहकारी कारखान्यांसंदर्भात आरोप केले गेले; परंतु सहकारी कारखाने चालवायला कोणी पुढे येत नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला. “यावर्षी देशात राज्याने साखरेची विक्रमी निर्यात केली, आम्ही जे चांगले झाले ते चांगलेच म्हणणार,” असेही ते म्हणाले.

अजित पवारांना दरेकरांचे प्रत्युत्तर

अजित पवारांनी सहकार क्षेत्रात दुजाभाव केला जात नाही, असे म्हणताच प्रवीण दरेकरांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. ‘‘सहकारात दुजाभाव होतोय. आमचे गडकरी सांगतात, एखाद्याचे वाटोळे करायचे तर त्याला साखर कारखाने चालवायला द्या,” असा टोला त्यांनी अजित पवारांना लगावला. ‘‘माझ्यावर आरोप झाले, आता प्रसाद लाड यांच्यावर आरोप सुरू आहेत. ते पगारदार नोकर आहेत, अशा प्रकारे एखाद्याला टार्गेट करायचे ठरले आहे. आज प्रसाद लाडांवर तक्रार, उद्या अणखी कोणावर करतील,” असा आरोपही दरेकरांनी यावेळी केला. मुंबै बँक प्रकरणावर जेव्हा राज्य सरकारने कारवाईचा बडगा उगारला. तेव्हापासून प्रवीण दरेकर साखर कारखान्यांचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in