मुंबईत आणखी पाणी कपात नाही; धरण क्षेत्रात पाण्याच्या पातळीत हळुवार वाढ

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची उघडिप सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत हळुवार वाढ होत आहे.
मुंबईत आणखी पाणी कपात नाही; धरण क्षेत्रात पाण्याच्या पातळीत हळुवार वाढ
File Photo/FPJ
Published on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची उघडिप सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत हळुवार वाढ होत आहे. १५ दिवसांपूर्वी धरण क्षेत्रात ५.३० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा उपलब्ध होता; मात्र धरण क्षेत्रात पावसाची उघडिप सुरू असल्याने मंगळवार, २ जुलै रोजी सातही धरणात ७.१५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी ७० हजार दशलक्ष लिटरवर आलेला पाणीसाठा २ जुलै रोजी १ लाख ३ हजार ५०३ दशलक्ष लिटरवर पोहोचला आहे. धरण क्षेत्रात पावसाची दमदार इनिंग सुरू राहिली, तर लवकरच मुंबईकरांची १० टक्के पाणीकपातीतून सुटका होईल, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाकडून व्यक्त करण्यात आला. दरम्यान, जुलै महिन्यात धरण क्षेत्रात पावसाची दमदार इनिंग होईल, त्यामुळे आणखी पाणीकपात करण्याबाबत कोणताही निर्णय नाही, असे मुंबई महापालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी सांगितले.

संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट झाली. त्यात जून महिन्यात कडक उन्हाळा असल्याने बाष्पीभवनामुळे आणखीच पाण्याच्या पातळीत घट होत गेली. त्यामुळे मुंबईत ५ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे; मात्र गेल्या पाच ते सहा दिवसांपासून धरण क्षेत्रात पावसाची उघडिप सुरू असून, हळुवार पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणातून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते.

दरम्यान, भातसा धरणातून १ लाख ३७ हजार दशलक्ष लिटर, तर अप्पर वैतरणातून ९१ हजार १३० दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा राज्य सरकारने उपलब्ध केला आहे. राखीव पाणीसाठा वापरास सुरुवात केली असून, राखीव पाणीसाठा आणि पालिकेच्या अखत्यारित असलेला पाणीसाठा पुढील २५ दिवस मुंबईची तहान भागवेल इतका आहे. त्यात जुलै महिन्यात पावसाची दमदार बॅटिंग धरण क्षेत्रात होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे तूर्तास तरी आणखी पाणी कपात करण्याबाबत कोणताही निर्णय नाही, असे पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी यांनी सांगितले.

तलाव क्षेत्रातील पाऊस

  • अप्पर वैतरणा - ३४४ मिमी

  • मोडक सागर - ४३९ मिमी

  • तानसा - ३९६ मिमी

  • मध्य वैतरणा - ४८५ मिमी

  • भातसा - ४९८ मिमी

  • विहार - ५५४ मिमी

  • तुळशी - ६२७ मिमी

२ जुलै रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

  • अप्पर वैतरणा - ०

  • मोडक सागर - २९,४०३

  • तानसा - २८,१३२

  • मध्य वैतरणा - २६,७८५

  • भातसा - १०,७६०

  • विहार - ६,०७१

  • तुळशी - २,३५३

logo
marathi.freepressjournal.in