मुंबई : अंधेरीतील गोखले पूल आणि सी. डी. बर्फीवाला पुलातील उंचीची तफावत दूर करण्यासाठी बर्फीवाला पूल पाडण्याची गरज नाही. जॅक विशेष अभियांत्रिकी तंत्रज्ञानाने पुलाचा स्लॅब उंचाऊ शकतो, अशी महत्वाची शिफारस करणारा १५ पानांचा अहवाल व्हीजेटीआयने मुंबई मनपाला सादर केला आहे.
अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल धोकादायक झाल्याने नोव्हेंबर २०२२ मध्ये वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. वाहतुकीसाठी पूल बंद केल्याने अंधेरी पूर्व पश्चिमेसह उपनगरात वाहतूककोंडीची मोठी समस्या निर्माण झाली. त्यामुळे गोखले पूल वाहतुकीसाठी खुला करा, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी लावून धरली. अखेर पुलाच्या कामाला वेग दिला. अखेर लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी गोखले पुलाच्या एका मार्गिकेचे लोकार्पण २६ फेब्रुवारीला झाले. बर्फीवाला पुलाला गोखले पूल जोडून जुहूपर्यंतच्या वाहतूककोंडीची समस्या दूर होणार होती. मात्र काही अभियांत्रिकी दोषांमुळे गोखले पुलाची उंची २.८ मीटरने अधिक वाढल्याने दोन पूल जोडण्याचा प्रयत्न फसला आहे. अतिशय महत्त्वपूर्ण प्रकल्प असलेल्या या कामातील चुकांमुळे पालिकेला मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले आहे.