चाकरमान्यांच्या कोकणवारीवर कॉपीराईट कुणाचाच नाही

मुंबई हायकोर्टाचे निरीक्षण; ‘देवाक काळजी’ वेबसिरीजच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
चाकरमान्यांच्या कोकणवारीवर कॉपीराईट कुणाचाच नाही

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त मुंबईहून कोकाणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या कोकणप्रेमावर मुंबई हायकोर्टाने शिक्कामोर्तब केले. लाखो चाकरमान्यांचे कोकणात जाणे, ही एक वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे. आपल्या पूर्वजांच्या मूळ गावी जाणे, ही सर्वसाधारण परंपरा आहे, असे स्पष्ट करताना न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी चित्रपट वा वेबसिरीजमध्ये वापर करण्याच्या अनुषंगाने या परंपरेवर कुणी एक व्यक्ती कॉपीराईट अर्थात स्वामीत्व हक्क सांगू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिला. त्यामुळे ‘देवाक काळजी’ वेबसिरीजच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा केला.

नॅव्हिन स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने कॉपीराइट उल्लंघन झाल्याचा आरोप करत ‘देवाक काळजी’ नावाच्या वेबसिरीजचे प्रदर्शन रोखा, अशी विनंती करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली. कंपनीच्या या याचिकेवर न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्या कंपनीने ‘देवाक काळजी’च्या निर्मात्यांनी स्क्रिप्टची कॉपी केल्याचा आरोप केला. गणेशोत्सवादरम्यान कोकणी कुटुंबे त्यांच्या कोकणातील वडिलोपार्जित गावाकडे जातात. याचिकाकर्त्या कंपनीने चाकरमान्यांच्या या हालचालींशी संबंधित स्क्रिप्टवर कॉपीराईटचा दावा केला. ‘देवाक काळजी’ वेबसिरीजचे दिग्दर्शक, अभिनेता, लेखक समीर खांडेकर, निर्माता वैभवी राणे आणि अभिनेता दिव्यलक्ष्मी मैस्नाम यांनी कॉपीराइटचे उल्लंघन केले आहे. खांडेकर यांनी २२ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या कलाकार कराराचा भंग केल्याचा आरोप केला. न्यायालयाने मात्र हा दावा फेटाळून लावला.

गणेशोत्सव कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याचा

गणेशोत्सव हा कोकणातील माणसांचा जिव्हाळ्याचा आहे. कोकणी कुटुंबे त्यांच्या वडिलोपार्जित गावाकडे जातात. याचिकाकर्त्या कंपनीचा चाकरमान्यांच्या या हालचालींशी संबंधित स्क्रिप्टवर कॉपीराईटचा दावा मान्य करता येणार नाही. वास्तविक अशा सामान्य थीममध्ये किंवा मध्यवर्ती कल्पनेमध्ये कुणीही कॉपीराइटचा दावा करू शकत नाही. महाराष्ट्र राज्यात गणपती उत्सवादरम्यान कुटुंबातील सदस्य त्यांच्या वडिलोपार्जित स्थळांना भेट देतात. विशेषतः मुंबईत स्थायिक असलेली कोकणी कुटुंबे मोठ्या प्रमाणावर कोकणातील मूळ घर गाठतात, असे स्पष्ट मत व्यक्त करताना याचिकाकर्त्यांने केलेले आरोप न्यायालयाने फेटाळून लावले.

भक्कम पुरावाच नाही

याचिकाकर्त्याला आपला दावा सिद्ध करण्यास प्रथमदर्शनी भक्कम पुरावाच नाही, असे स्पष्ट करताना ‘देवाक काळजी’ ही वेब सिरीज यूट्युबवर प्रदर्शित करण्यास विरोध करणारा नॅव्हिन स्टुडिओजचा अंतरिम अर्ज फेटाळला. तसेच याचिकेची सुनावणी २५ आक्टोबरपर्यंत तहकूब ठेवली.

logo
marathi.freepressjournal.in