कोणाला घाबरायचे नाही की कुणाला जुमानायचे नाही ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोणाला घाबरायचे नाही की कुणाला जुमानायचे नाही ; मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे

‘कुणालाही न घाबरता आणि न जुमानता मतदानाला सामोरे जा’ असे सांगत, मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांमध्ये जोश भरला.

राज्यसभेच्या निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी शिवसेनेकडून सुरु असून त्यासाठी सर्व शिवसेना आमदार आणि काही अपक्षांची मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी बैठक घेतली. भाजपच्या दबावाला व प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर ‘वर्षा’ निवासस्थानावरून सर्व आमदारांना पश्चिम उपनगरातील मढ आयलंड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये वोल्वो गाड्यातून सुरक्षितस्थळी पाठवण्यात आले. विधानसभेच्या २८७ सदस्यांमधून राज्यसभेचे ६ सदस्य १० जून रोजी निवडून द्यायचे आहेत. काँग्रेस १, राष्ट्रवादी १, शिवसेना १ व भाजप २ असे ५ उमेदवार आरामात निवडून जात आहेत. मात्र सहावा उमेदवार शिवसेनेचे संजय पवार की भाजपचे धनंजय महाडीक अशी चुरस आहे. त्यातून भाजप आणि शिवसेना या जुन्या मित्रपक्षांमध्ये मोठी चढाओढ लागली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आपल्या आमदारांना प्रोत्साहित केले.

"आपल्याला एका कट्टर शिवसैनिकाला निवडून आणायचे आहे. कोणाला घाबरायचे नाही की कुणाला जुमानायचे नाही. मी मुख्यमंत्री म्हणून तर शिवसेना पक्ष म्हणून कायम तुमच्या पाठिशी आहे. तुमची मतदारसंघातील कोणतीच कामे अडणार नाहीत. कोणत्याही ऑफरला बळी पडू नका, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका', असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

या बैठकीला शिवसेनेचे आणि काही अपक्ष आमदार उपस्थित होते. बैठकीला येताना आमदार बॅगा घेऊन आले होते. बैठकीनंतर सर्व आमदारांची पाठवणी रिट्रीट हॉटेलवर करण्यात आली. १० जून रोजी मतदानापर्यंत या आमदारांना हॉटेलवर ठेवण्यात येणार आहे. मते फुटू नयेत यासाठी शिवसेना मोठी खबरदारी घेत आहे.

दरम्यान, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेस येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये मंगळवारी सायंकाळी महाविकास आघाडीच्या सर्व तसेच सहयोगी आमदारांची बैठक ठेवली आहे. आघाडी सरकार स्थापन होताना जशी आमदारांना शपथ दिली, तसा शक्तीप्रदर्शनाचा कार्यक्रम उद्या होणार आहे. यातून आघाडी आपले संख्याबळ दाखवणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्वव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रभारी मल्लीकार्जून खर्गे मार्गदर्शन करणार आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in