
मुंबई : मुंबईत गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस)आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत नसून आतापर्यंत केवळ तीन रुग्णांची नोंद पालिकेकडे झाली आहे. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर दुसरा रुग्ण बरा झाला आहे. आणि तिसऱ्या रुग्णांचे उपचार सुरू असून लवकरच त्याला डिस्चार्ज देऊन घरी पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईत या आजाराची दहशत नसून लोकांनी घाबरून जाऊ नये. तसेच, या आजारावरील उपचारांसाठी पालिकेकडे पुरेसा औषध साठा आणि तज्ज्ञ डॉक्टर असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर दक्षा शहा यांनी दिली आहे.
दोन दिवसांपूर्वीच गुईलेन बॅरे या आजाराने नायर रुग्णालयात एका ५३ वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच नायर रुग्णालयामध्ये पालघर येथून असलेली आणखी एक १६ वर्षांची मुलगी गुईलेन बॅरे सिंड्रोम आजाराचा उपचार घेत होती. त्या तरुणीवर योग्य ते उपचार करून तिला घरी पाठवण्यात आले आहे.
मुंबईत फारसे रुग्ण नाहीत
मुंबई शहरातील रुग्णालयात राज्यातीलच नव्हे तर देशातील अन्य ठिकाणाहून लोक उपचार घेण्यासाठी येत असतात. त्यांच्यापैकी कोणालाही गुईलेन बॅरेची बाधा झाल्याचे आढळून येऊ शकते. त्यामुळे लोकांनी घाबरण्याची गरज नाही. पालिका प्रशासन या आजारासाठी सज्ज असून मुबलक प्रमाणात औषधसाठा आणि योग्य ती यंत्रणा पालिकेकडे उपलब्ध असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. तसेच, पालिकेकडे औषधसाठा नसल्यामुळे गुईलेन बॅरेने तरुणाचा मृत्यू झाल्याच्या बातमीत काही तथ्य नाही, असेही शहा म्हणाल्या.
गुईलेन बॅरे बाधित रुग्णाला महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून उपचारासाठी दोन लाख रुपयांची मदत करण्यात आली होती. सदर रुग्णाला आवश्यक असलेले आयव्हीआयजी हे औषध महागडे असून त्याची किंमत १२ हजार रुपये आहे. ज्याची गरज रुग्णांना कधीतरी असते. त्यामुळे ते औषध स्टॉकमध्ये नसते. तसेच रुग्णाने त्याचे बिल प्रशासनाला सादर केले तर त्याचा परतावा करण्याची तरतूद आहे. त्यामुळे औषध साठा नाही, असे बोलणे चुकीचे ठरेल.
- डॉ. शैलेश मोहिते, अधिष्ठाता नायर रुग्णालय