सायन, लालबाग भागांत पाणी तुंबण्याचे नो-टेन्शन; मॅनहोलची ३० मीटरपर्यंत अंतर्गत सफाई होणार

पावसाच्या पाण्यासह गाळ वाहून जाणार; पालिका ३१ कोटी रुपये खर्चणार
सायन, लालबाग भागांत पाणी तुंबण्याचे नो-टेन्शन; मॅनहोलची ३० मीटरपर्यंत अंतर्गत सफाई होणार

मुंबई : दोन मॅनहोलमधील अंतर ३० मीटर असल्याने अंतर्गत गाळ काढणे यात अनेक अडचणी येतात. पावसाळ्यात मनुष्यबळाचा वापर करणे शक्य होत नसल्याने मशीनद्वारे सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ३१ महिन्यांचे कंत्राट (पावसाळा वगळून) देण्यात आले असून, या कामासाठी मुंबई महापालिका ३० कोटी ९४ लाख रुपये कंत्राटदाराला मोजणार आहे. या कामामुळे सायन ते लालबागदरम्यान पावसाचे पाणी तुंबण्याचे टेन्शन कमी होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

गाळ मशिन्सद्वारे साफसफाई

मुंबई महापालिकेच्या शीव ते लालबागपर्यंतच्या ब्रिटिशकालीन जुन्या भूमिगत पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांमध्ये गाळ जमा झाल्याने अनेकदा पावसाचे पाणी वाहून नेण्यात अडचणी येत आहे. भूमिगत पावसाळी वाहिन्यांची साफसफाई मनुष्य प्रवेश असणाऱ्या मॅनहोल्सपुरतीच केली जात असल्याने दोन मॅनहोल्समधील अंतरामधील सफाई होत नाही. परिणामी पावसाचे पाणी वाहून नेण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेता आता या भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची साफसफाई करून दोन मॅनहोलमध्ये साचलेला गाळ मशिन्सद्वारे साफ करण्यात येणार आहे.

सुयोग्य अशी मशिनरी उपलब्ध नाही

"मुंबई शहर व उपनगरात पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे तयार करण्यात आले आहे. मुंबई शहरात भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची मोठ्या प्रमाणात जाळे पसरलेले असून, या पर्जन्य जलवाहिन्यांचे बॉक्स व आर्च वाहिन्यांची योग्य प्रकारे देखभाल मनुष्यबळ व मशिनरीच्या सहाय्याने केली जाते. परंतु दोन मनुष्य प्रवेशिकामध्ये अर्थात मॅनहोलमधील सर्वसाधारणपणे अंतर हे ३० मीटर एवढे असल्याने ते साफ करण्यासाठी सुयोग्य अशी मशिनरी तसेच कुशल मनुष्यबळ या खात्याकडे उपलब्ध नाही.

मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेडला कंत्राट

भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांत असलेला अंधार, विषारी वायू आणि हवा खेळती नसल्यामुळे हे काम खात्यांतर्गत मनुष्यबळाने करून घेणे शक्य नसल्याने या कामांसाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे यासाठी मागवलेल्या निविदा प्रक्रियेत मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पात्र ठरली असून, पुढील ३१ महिने पावसाळा वगळून हे कंत्राट देण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in