सिमेंट क्राॅकिटच्या रस्त्यांवर पाणी साचण्याचे नो टेन्शन

पाणी भूमिगत टाक्यात जमा होईल, असा विश्वास पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी व्यक्त केला आहे
सिमेंट क्राॅकिटच्या रस्त्यांवर पाणी साचण्याचे नो टेन्शन

मुंबईतील रस्ते सिमेंट क्राॅकिटचे करण्यात येत असून सिमेंटच्या रस्त्यांवर पाणी साचण्याचा त्रास मुंबईकरांना होऊ नये यासाठी सिमेंट क्राॅकिटच्या रस्त्यांवर प्रत्येक १५० मीटरवर भूमिगत टाकी बसवण्यात येणार आहेत. तसेच विविध प्राधिकरणाच्या युटिलिटीसाठी विशेष डक्ट तयार करण्यात येणार आहेत. तसेच सिमेंट क्राॅकिटच्या रस्त्यांवर जमा होणारे पाणी भूमिगत टाक्यात जमा होईल, असा विश्वास पालिकेचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी व्यक्त केला आहे.

डांबरी रस्त्यावर खड्डे पडत असल्याने मुंबई महापालिका प्रशासनाने सिमेंट क्राॅकिटचे रस्ते करण्यावर भर दिला जात. मुंबईत सुमारे २ हजार किमीचे रस्ते आहेत. हे रस्ते मजबूत करण्यासाठी पालिकेने सर्व रस्ते टप्प्याटप्प्याने सिमेंट काँक्रिटचे करण्याचे धोरण आखले आहे. दरवर्षी २०० किमीचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे बनवण्याचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. यानुसार आतापर्यंत १०५० किमी रस्ते सिमेंट काँक्रिटने बनवण्यात आले आहेत. तर उर्वरीत ९५० किमी रस्तेही सिमेंट काँक्रिटने बनवण्यात येणार आहेत.

सिमेंट काँक्रिट रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडण्याचे प्रमाण अत्यल्प असून देखभालीचा खर्चदेखील कमी असल्याने काँक्रिटचे रस्ते बनवण्यात येत आहेत. सध्या २३६.५८ लांबीच्या रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण काम सुरू आहे. त्यासाठी २ हजार २०० कोटी रुपयांचा खर्च होत आहे. तर आता आणखी तब्बल ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात येणार आहे.

रस्ते खोदावे लागणार नाहीत

नागरिकांना वीज, केबल, फोनसह अनेक सुविधा देताना रस्त्याखालून दिल्या जातात. मात्र हे काम करीत असताना सिमेंटचा रस्ता खोदल्यास पुन्हा अपेक्षित प्रमाणात दुरुस्ती शक्य होत नाही. त्यामुळे आता फोन, केबल, विजेच्या वाहिन्या रस्त्याखालून टाकण्यासाठी रस्ते खोदावे लागणार नाहीत. दरम्यान, सिमेंटच्या रस्त्यासाठी किमान ६ मीटर अशी अट आतापर्यंत होती. मात्र, आता ६ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्तेही सिमेंट काँक्टिचे बनवण्यात येणार आहेत. या सर्व रस्त्यांची प्रत्यक्ष कामे सुरू असताना कामाची सविस्तर माहिती नागरिकांना बॅरिकेडवरील क्यूआर कोड स्कॅन करून पाहता येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in