

स्वीटी भागवत/मुंबई
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प ९९ टक्के पूर्ण झाला असून, १ मे रोजी याचे लोकार्पण होणार आहे. या प्रकल्पासाठी ६७०० कोटी रुपये खर्च झाला आहे. तरीही मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर टोल दरात कोणतीही वाढ होणार नसल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे यांनी शनिवारी प्रकल्प स्थळाला भेट देऊन कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडेल. या प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल आणि प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित व सिग्नलमुक्त होणार असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले की, प्रकल्पाच्या कामाची गुणवत्ता समाधानकारक असून उर्वरित किरकोळ कामे येत्या काही दिवसांत पूर्ण होतील. १०.५ किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पामध्ये दोन मोठे बोगदे, उन्नत मार्ग आणि व्याघ्र दरीवर सुमारे १८२ मीटर उंचीचा केबल-स्टे पूल बांधण्यात आला आहे. सुमारे २३.७५ मीटर रुंदीचा हा बोगदा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक आहे. ताशी ७० किलोमीटर वेगाचे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भूप्रदेश अशा आव्हानात्मक परिस्थितीत एमएसआरडीसीने हे काम यशस्वीपणे पूर्ण केले आहे.
लोणावळा तलावाच्या पातळीपासून सुमारे १८२ मीटर खालून हा मार्ग जात असल्याने याचे काम क्लिष्ट होते. हा मार्ग कार्यान्वित झाल्यावर खंडाळा घाट टाळता येईल, ज्यामुळे प्रवासाचा वेळ २० ते ३० मिनिटांनी कमी होईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. सुमारे ६,७०० कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पाला २०१९ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री असताना मंजुरी मिळाली होती.
पर्यटनाला चालना मिळणार
या बोगद्यांची रचना गड-किल्ले आणि कार्ला लेणींच्या संकल्पनेवर आधारित असून, यामुळे लोहगड, विसापूर आणि कार्ला लेणी यांसारख्या पर्यटन स्थळांनाही चालना मिळणार आहे.