
मुंबई : वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाला असला तरी मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कोणतीही कपात केली जाणार नाही, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीपासून दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र शासनानेदेखील मुंबईसाठी ‘निभावणी साठ्या’तून पाणी उपलब्ध करून दिले आहे. तसेच पालिकेने दिनांक ३१ जुलैपर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशारीतीने पाण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीचा विचार करता मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा महापालिकेचा कोणताही इरादा नसल्याचे सांगण्यात आले.
हवामान खात्याशी समन्वय साधून पावसासंबंधी अंदाज लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही महापालिकेने नमूद केले. महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी बृहन्मुंबई महापालिका मुख्यालयात सोमवारी उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला. अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर, जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते.
सध्या जलाशयांमध्ये २२.६६ टक्के पाणीसाठा
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण २२.६६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. एवढेच नव्हे, तर महाराष्ट्र शासनाने बृहन्मुंबई महानगरपालिकेस भातसा धरण आणि अप्पर वैतरणा धरणातून निभावणी साठ्यातून अतिरिक्त पाणीपुरवठा करण्याचे यापूर्वीच मान्य केले आहे. याद्वारे मुंबईसाठी दिनांक ३१ जुलै २०२५ पर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सद्य:स्थितीत पाणीकपातीची कोणतीही शक्यता नाही. मात्र, धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असला तरीही मुंबईकरांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावा आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.