मुंबई : मुंबईतील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी जुन्या जलवाहिन्यांच्या जागी नवीन जलवाहिनी टाकण्यात येत आहे. पालिकेच्या कुर्ला एल. वॉर्ड आणि घाटकोपर एन. वॉर्डातील जुन्या जलवाहिन्या बदलण्याचा निर्णय घेतला असून यामुळे कुर्ला, घाटकोपरवासीयांना पाण्याच्या समस्येतून दिलासा मिळणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिका ७४ कोटी रुपये खर्चणार आहे.
मुंबईला १२० किलोमीटर अंतरावरून सात धरणांतून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून त्या जीर्ण झाल्या आहेत. यामुळे दूषित पाणीपुरवठा होणे, जलवाहिन्यांना गळती लागणे, असे प्रकार वारंवार घडत असून लाखो लिटर पाण्याची नासाडी होते. पूर्व उपनगरातही पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या जुन्या झाल्या असून त्या बदलण्याचा निर्णय पालिकेच्या जलविभागाने घेतला आहे. कुर्ला व घाटकोपर परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विभागनिहाय टप्प्याटप्प्याने कामे हाती घेण्यात आली आहेत. घाटकोपर आणि कुर्ला भागात नवीन जलवाहिन्या टाकल्याने येथील पाणीपुरवठ्यात सुधारणा होईल, असा विश्वास पालिकेच्या जलविभागाकडून व्यक्त केला जात आहे.
घाटकोपर एन. विभागातील काथोडीपाडा येथील उंचावर वसलेल्या लोकवस्तीसह घाटकोपर आणि कुर्ला विभागाच्या अन्य भागातील पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी विविध व्यासाच्या जलवाहिन्या टाकणे, बदलणे व अन्य संलग्न कामे करण्यात येणार आहेत. त्याशिवाय पूर्व उपनगरातील सिमेंट काँक्रिटीकरण, प्रस्तावित असलेल्या रस्त्याखालील विविध व्यासाच्या जलवाहिन्या टाकणे, बदलणे व अन्य कामे करण्यात येणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. महिनाभरात निविदा प्रक्रिया पूर्ण करून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या कामाची सुरुवात होईल, असे जल अभियंता विभागाकडून सांगण्यात आले आहे.
टोटल स्टेशन सर्वेक्षण उपयुक्त
हे काम करण्यासाठी पालिकेने गेल्या काही महिन्यांत कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी भागातील जलवाहिन्यांचे नकाशे अद्ययावत करणे, जलवाहिन्यांवरील झडपा व छेद जोडण्यांची इत्यंभूत माहिती एकत्रित करणे, यासाठी जीआयएस प्रणालीचा वापर करून टोटल स्टेशन सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणानुसार डोंगराळ भागात उपलब्ध असलेल्या जलवितरण व्यवस्थेचा अभ्यास करून सध्याची व भविष्यातील पाण्याची मागणी लक्षात घेवून आवश्यक जलवाहिन्या, जोडण्यांचे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाण्याचे समान वाटप व जलवितरण व्यवस्थेतील पाण्याच्या दाबाचे नियमन करण्यासाठी दाब नियंत्रक झडपांवर प्रवाह मापके बसविण्यात येणार आहेत. पाणी गळती अन्वेषण व दुरुस्ती यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.