मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्याबाबत बदनामीकारक विधाने केल्याप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आमदार नितेश राणे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने समन्स बजावूनही गैरहजर राहणाऱ्या नितेश राणे यांच्याविरोधात माझगाव न्यायालयाने मंगळवारी नितेश जामीनपात्र वॉरंट जारी करीत न्यायालयात हजर राहण्याचे सक्त आदेश देत सुनावणी तीन आठवडे तहकूब ठेवली.
वारंवार बदनामीकारक विधाने करणाऱ्या नितेश राणे यांच्याविरुद्ध खासदार संजय राऊत यांनी माझगाव दंडाधिकारी न्यायालयात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. या खटल्याची दखल घेत दंडाधिकारी संग्राम काळे यांनी सुरुवातीला समन्स त्यानंतर जामीनपात्र वॉरंट बजावले होते.
मंगळवारी, ३० जानेवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान राणे गैरहजर राहिल्याने त्यांच्या वकिलांनी राणे यांना व्यक्तीशः हजर राहण्यापासून सूट द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. याला संजय राऊत यांच्या वतीने ॲॅड. मनोज पिंगळे यांनी जोरदार आक्षेप घेत, राणे यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती केली. महानगर दंडाधिकारी संग्राम काळे यांनी ही विनंती मान्य करत नितेश राणे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करत सुनावणी फेब्रुवारीमध्ये निश्चित केली.