
कल्याण : कल्याणमध्ये दोन दिवसांपूर्वीच एका परप्रांतीय अधिकाऱ्याने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच एका परप्रांतीयाने आणखी एका मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मराठी कुटुंबाने जाब विचारला असता परप्रांतीय पांडे कुटुंबाने या मराठी कुटुंबाला मारहाण केली. याप्रकरणी पांडे पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडे पती पत्नीच्या मारहाणीत एक मराठी तरुण जखमी झाला आहे. या तरुणाच्या पत्नीला आणि आईलाही या दोघांनी मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीत दोन कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता. मुलांच्या खेळण्यावरुन हा वाद झाला. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, अशी तक्रार तिच्या आई-वडिलांनी केली. आम्ही पीडित मुलीच्या आई-वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आई-वडिलांनी पांडे कुटुंबाला जाब विचारला असता त्या कुटुंबाने मारहाण केली. पांडे पती-पत्नीच्या विरोधात आम्ही तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.