गोविंदा आला रे...कीर्तीकरांविरुद्ध शिंदे गटाकडून अभिनेता गोविंदा रिंगणात?

गोविंदा यांना संसदीय कामकाजाचा अनुभव आहे. कारण याअगोदर त्यांनी काँग्रेसकडून उत्तर मुंबईतून लढत देत २००४ मध्ये माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांचा पराभव केला होता.
गोविंदा आला रे...कीर्तीकरांविरुद्ध शिंदे गटाकडून अभिनेता गोविंदा रिंगणात?

विशेष प्रतिनिधी/मुंबई

महायुतीत जागावाटपात मुंबईत उत्तर-पश्चिम मतदारसंघ शिंदे गटाच्या वाट्याला येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात एखादा सेलिब्रिटी, चर्चेतला चेहरा असावा, असे शिंदे गटाचे म्हणणे आहे. त्यासाठी अभिनेता गोविंदा आहुजा यांना शिंदे गटात घेऊन उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे गोविंदा पुन्हा निवडणूक मैदानात उतरल्यास ठाकरे गटाचे या मतदारसंघातील उमेदवार अमोल कीर्तीकर यांना तगडी झुंज द्यावी लागेल.

गोविंदा यांना संसदीय कामकाजाचा अनुभव आहे. कारण याअगोदर त्यांनी काँग्रेसकडून उत्तर मुंबईतून लढत देत २००४ मध्ये माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांचा पराभव केला होता. निवडणूक लढण्याचा अनुभव असल्याने राजकीय डावपेचातही ते तरबेज आहेत. त्यामुळे त्यांना पक्षात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघात ठाकरे गटाच्या शिवसेनेने विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांनी या मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली आहे. ते प्रथमच खासदारकीची निवडणूक लढत आहेत.

त्यांच्यासमोर तगडा उमेदवार मैदानात उतरवून ही जागा जिंकण्याचा शिंदे यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे कीर्तीकर यांच्या विरोधात चर्चेतला चेहरा देण्याची योजना आहे. त्यासाठी अभिनेता गोविंदा आहुजा यांना गळ घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे झाल्यास कीर्तीकर यांना तुल्यबळ लढतीला सामोरे जावे लागेल. याचा फायदा शिंदे गटाला होईल असा कयास आहे. याअगोदर या जागेसाठी प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर, अक्षय कुमार यांनाही विचारणा झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांनी स्पष्ट नकार दिला. तसेच माधुरी दीक्षित यांनाही गळ घालण्याचा प्रयत्न झाल्याचे बोलले जाते.

मुख्यमंत्र्यांची गोविंदाशी चर्चा?

प्रसिद्ध अभिनेते तथा माजी खासदार गोविंदा आहुजा हे या मतदारसंघात सरस उमेदवार ठरू शकतात, असा महायुतीच्या नेत्यांचा कयास आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू असून, याअगोदर गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर भेटही दिली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी उमेदवारीबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करून लोकसभेच्या मैदानात उतरू शकतात, अशी चर्चा आहे. तसे झाल्यास उत्तर-पश्चिम मुंबईची लढतही चुरशीची होऊ शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in