
मुंबई : महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी फेटाळून लावला. गुंतवणूकदारांची स्वत:ची गणिते असतात. तसेच राज्य सरकार किती प्रभावी व कार्यक्षमतेने काम करते हेही गुंतवणूकदार पाहत असतात. गेल्या दहा वर्षात केवळ भाजपशासित राज्यांमध्येच सर्व गुंतवणूक आलेली नाही, असे जयशंकर यांनी सांगितले. रविवारी मुंबईत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
स्पर्धात्मक संघराज्य हे देशासाठी चांगले आहे. भारत-मध्य पूर्व आर्थिक मार्गिकेचा महत्त्वाचा भाग महाराष्ट्र आहे. प्रत्येक गुंतवणूकदार स्वत:ची व्यवसायाची गणिते मांडत असतो. तुम्ही केवळ केंद्र सरकारवर आरोप करू नका. स्वत:च्या गुणवत्तेकडेही लक्ष द्या. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
२६/११ हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर दिले नाही, पण...
मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर दिले नाही. पण, असा हल्ला पुन्हा झाल्यास सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल, असे प्रतिपादन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना जयशंकर म्हणाले की, मुंबई ही भारत व जगासाठी दहशतवादविरोधाचे प्रतीक आहे. २६/११ च्या वेळी दहशतवादी हल्ला होऊनही भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिले नव्हते. आता मात्र तसे होणार नाही. भारत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा सदस्य होता. तेव्हा तो दहशतवादविरोधी समितीचा अध्यक्ष होता. तेव्हा दहशतवादविरोधी समितीची बैठक दहशतवादी हल्ला झालेल्या हॉटेलमध्येच घेतली होती. भारत हा दहशतवादाच्याविरोधात खंबीरपणे लढत आहे. आज भारत दहशतवादाविरोधी लढ्यात आघाडीवर आहे, असे जयशंकर म्हणाले.
देमचोक, देपसांगमधील सैन्य माघार हे पहिले पाऊल
भारत आणि चीन हे लवकरच लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पुन्हा गस्त सुरू करणार आहेत. देमचोक व देपसांग येथून दोन्ही देशांचे सैन्य माघारी घेणे हे पहिले पाऊल असून, त्यापुढे या भागातील तणाव दूर करणे हे पुढचे पाऊल असेल. या भागात ३१ ऑक्टोबर २०२० पूर्वीची स्थिती पूर्ववत होईल, असा विश्वास आम्हाला आहे., असेही जयशंकर यांनी सांगितले.
गरज पडल्यास सडेतोड प्रत्युत्तर
आता भारत दहशतवाद सहन करणार नाही. जर कोणी तो प्रयत्न केल्यास त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले जाईल. सकाळी तुम्ही चर्चा कराल आणि रात्री तुम्ही दहशतवादी कारवाया कराल, हे चालणार नाही. भारत आता हे सहन करणार नाही. गरज पडल्यास आम्ही कठोर कारवाईही करू, असा इशारा जयशंकर यांनी दिला.
विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र गरजेचा!
केंद्र सरकारच्या विचारांच्या मिळतेजुळते सरकार महाराष्ट्रात असणे गरजेचे आहे. उद्योग, तंत्रज्ञान व मूलभूत पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र हे आघाडीचे राज्य आहे. विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र गरजेचा आहे, असेही ते म्हणाले.