
इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याने मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतील १५१ इमारत मालक व रहिवाशांना नोटीस बजावली आहे. नोटीस दिल्यानंतर १२० दिवसांत अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित न केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मुंबई अग्निशमन दलाने दिला आहे.
मुंबईत गेल्या काही दिवसांत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून हायराईज इमारतीत आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करत दर सहा महिन्यांनी ऑडिट रिपोर्ट मुंबई अग्निशमन दलाला सादर करणे बंधनकारक आहे. मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतील ३२९ इमारतींची नोव्हेंबर, २०२१ ते एप्रिल, २०२२ या सहा महिन्यांत अग्निसुरक्षा यंत्रणेची पाहणी केली होती.
हायराईज इमारतीत आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली असून, गेल्या १० वर्षांत १,५०० हून अधिक हायराईज इमारतीत आगीच्या घटना घडल्या आहेत. आगीच्या घटना टाळण्यासाठी इमारतीत फायर फायटिंग सिस्टीम कार्यान्वित करत दर सहा महिन्यांनी ऑडिट रिपोर्ट मुंबई अग्निशमन दलाला सादर करणे बंधनकारक आहे. मात्र, ३२९ इमारतींचा अहवाल न मिळाल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत १५१ इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित नसल्याने कायदेशीर कारवाईची नोटीस बजावण्यात आली.