किटक नाशक विभागाकडुन मुंबईकरांना नोटीसा

 किटक नाशक विभागाकडुन मुंबईकरांना नोटीसा
Published on

डास उत्पत्ती स्थाने नष्ट न करणाऱ्या सोसायट्या, गॅरेज, घरमालक आदी ३ हजार ६५९ मुंबईकरांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पालिकेच्या किटक नाशक विभागाचे प्रमुख अधिकारी राजेंद्र नारिग्रेकर यांनी सांगितले. दरम्यान, आवाहन करुन दुर्लक्ष करणाऱ्या २९७ घर मालक, सोसायटी, गॅरेज आदी विरोधात न्यायालयात दावा दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यात मलेरिया डेंग्यू, लेप्टो, कावीळ, स्वाईन फ्ल्यू, गॅस्ट्रो आदी साथीचे आजार पसरण्याचा धोका अधिक असतो. मलेरिया डेंग्यूची उत्पत्ती डासांमुळे होते. त्यामुळे डासांची उत्पत्ती स्थाने निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात येते. मात्र अनेक मुंबईकर बेफिकिर असल्याने डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मुंबईतील ३,६५९ जणांना नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस देऊनही दुर्लक्ष करणाऱ्या २९७ जणांविरोधात न्यायालयात दावा दाखल करण्यात आल्याचे नारिग्रेकर यांनी सांगितले. पाण्याची टाकीचे झाकण तुटले असेल ते नीट बसवणे, घराजवळ, सोसायटी परिसरात, गॅरेजजवळ खड्डा पडला असून माती टाकून तो बुजवण्याचे आव्हान करुनही दुर्लक्ष करणाऱ्यांना नोटीस बजावण्यात येते, असेही त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in