पीव्हीआर आयनॉक्स मल्टीप्लेक्सला नोटीस छोटे चित्रपट प्रदर्शित करत नसल्याचा आरोप

चित्रपटांसाठी पडद्यांचे अयोग्य वाटप आणि प्रदर्शनात अडथळे निर्माण केले, असा आरोप याचिकेत केला
पीव्हीआर आयनॉक्स मल्टीप्लेक्सला नोटीस
 छोटे चित्रपट प्रदर्शित करत नसल्याचा आरोप

मुंबई : देशातील मोठे चित्रपट प्रदर्शक पीव्हीआर आयनॉक्स मल्टीप्लेक्सला भारतीय स्पर्धा आयोगाने नोटीस बजावली आहे. या कंपनीच्या मल्टीप्लेक्समध्ये छोट्या व स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांचे चित्रपट प्रदर्शित करत नसल्याचा आरोप केला आहे. या मल्टीप्लेक्समध्ये केवळ मोठ्या चित्रपट अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित केले जातात.

माजी आयपीएस अधिकारी व कायदा कार्यकर्ते वाय. पी. सिंग यांनी सीसीआयकडे याबाबत याचिका दाखल केली होती. पीव्हीआर आयनॉक्स यांच्याकडे देशातील सर्वात मोठे मल्टीप्लेक्सचे जाळे आहे. चित्रपट प्रदर्शित करताना ही कंपनी पूर्वग्रहदूषितता बाळगते, असे याचिकेत म्हटले आहे. या प्रकरणी भारतीय स्पर्धा आयोगाने पीव्हीआरला चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

मोठ्या निर्मात्याकडून सुमार चित्रपटांची निर्मिती केली जाते. त्याचा प्रचार मात्र जोरदार केला जातो. कारण मोठ्या निर्मात्यांकडे मोठे बजेट असते. त्यात खऱ्या अर्थाने सर्जनशील चित्रपट दिग्दर्शकांची प्रतिभा मारली जाते, असे वाय. पी. सिंग यांनी याचिकेत म्हटले आहे.

ज्या दिग्दर्शकांना उच्च आशयाचे चित्रपट बनवायचे आहेत त्यांनाही फॉर्म्युलावर आधारित चित्रपटांचा अवलंब करणे बंधनकारक आहे. हे चित्रपट उद्योगासाठी चांगले नाही आणि आपल्या देशाच्या बौद्धिक वाढीसाठीही नाही, असे याचिकादाराने सांगितले.

माजी आयपीएस अधिकारी सिंग यांनी कायदेशीर व्यवस्थेवर आधारित - “द इंडियन सुपारी कंपनी” नावाचा चित्रपट पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. “चित्रपटाची आवश्यक थीम म्हणजे तपास यंत्रणांचा वापर करून कायद्यात फेरफार करण्यासाठी कॉर्पोरेट संस्था तयार करणे,” असे सिंग यांनी स्पष्ट केले.

पीव्हीआर आयनॉक्ससोबत आपला चित्रपट प्रदर्शित करत असताना चित्रपट प्रदर्शन व्यवसायावर नियंत्रण ठेवणाऱ्या मक्तेदारी संस्थांवर त्यांनी आरोप केला. चित्रपटांसाठी पडद्यांचे अयोग्य वाटप आणि प्रदर्शनात अडथळे निर्माण केले, असा आरोप याचिकेत केला.

logo
marathi.freepressjournal.in