शासकीय, निमशासकीय संस्थांना नोटिसा: पावसाळापूर्व झाडांची छाटणी करा; दुतर्फा पार्किंगचा अडथळा

मुंबईत एकूण १ लाख ४६ हजार ७४४ झाडांची छाटणी करण्याचे उद्दिष्ट आहे. मृत झालेल्या किंवा किडीचा प्रादूर्भाव असलेल्या झाडांबाबत अथवा सकृतदर्शनी धोकादायक झालेल्या झाडांबाबत महानगरपालिकेच्या नागरी सेवासुविधाविषयक १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
शासकीय, निमशासकीय संस्थांना नोटिसा: पावसाळापूर्व झाडांची छाटणी करा; दुतर्फा पार्किंगचा अडथळा
Published on

मुंबई : पावसाळ्यात धोकादायक झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडतात. यंदाही धोकादायक झाडांच्या फांद्या कोसळण्याची टांगती तलवार कायम असून मुंबईतील ३,६९० खासगी सोसायटी, सरकारी व निमसरकारी संस्थांना पालिकेच्या उद्यान विभागाने नोटीसा बजावल्या आहेत. पावसाचे आगमन होण्याआधी झाडांच्या फांद्यांची छाटणी करून घ्या, असे आवाहन पालिकेच्या उद्यान विभागाने केले आहे. दरम्यान, रस्त्यांच्या दुतर्फा पार्किंग असलेली वाहने फांद्या छाटणीत अडचणीची ठरत असल्याने वाहनधारकांनी वृक्षछाटणीत पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

मुंबईत एकूण १ लाख ४६ हजार ७४४ झाडांची छाटणी करण्याचे उद्दिष्ट आहे. मृत झालेल्या किंवा किडीचा प्रादूर्भाव असलेल्या झाडांबाबत अथवा सकृतदर्शनी धोकादायक झालेल्या झाडांबाबत महानगरपालिकेच्या नागरी सेवासुविधाविषयक १९१६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. याबाबत पालिकेच्या विभाग कार्यालयातील कनिष्ठ वृक्ष अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य ती कार्यवाही पावसाळ्यापूर्वी करवून घेता‌ येईल. महानगरपालिका क्षेत्रातील सर्व खासगी जागा असो किंवा शासकीय किंवा निमशासकीय; या झाडांची छाटणी पालिकेच्या पूर्व परवानगीनुसार पावसाळ्यापूर्वीच करावी, जेणेकरून संभाव्य जीवित अथवा वित्तहानी टाळता येईल; असे आवाहन जितेंद्र परदेशी यांनी केले आहे.

वर्ष २०१७ मध्ये झालेल्या वृक्षगणनेनुसार मुंबईत २९ लाख ७५ हजार २८३ झाडे आहेत. यापैकी १५ लाख ६३ हजार ७०१ एवढी झाडे खासगी संस्थांच्या आवारांमध्ये आहेत. तर ११ लाख २५ हजार १८२ एवढी झाडे शासकीय इमारती तसेच आस्थापनांच्या परिसरांमध्ये आहेत. एकूण वृक्षांपैकी १ लाख ८५ हजार ९६४ झाडे ही रस्त्यांच्या कडेला आहेत. यापैकी रस्त्यांच्या कडेला असलेल्या १ लाख १२ हजार ७२८ झाडांच्या फांद्यांची छाटणी करणे आहे. सध्या १५ हजार ८२१ झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे काम सुरू असून ३१ मेपर्यंत हे काम पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

३ हजार ६९० जणांना नोटीस!

गृहनिर्माण सहकारी संस्था (हाऊसिंग सोसायटी), शासकीय - निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणा-या झाडांची निगा घेण्याची सर्व जबाबदारी ही संबंधित मालकाची किंवा वापरकर्त्याची असते. हाऊसिंग सोसायटी, शासकीय - निमशासकीय संस्था, खासगी जागा इत्यादींमध्ये असणा-या वृक्षांच्‍या छाटणीकामी, संतुलित करणेकामी महानगरपालिकेने ३ हजार ६९० नोटीस बजावण्यात आली आहे.

सर्वाधिक नोटिसा या वॉर्डात

  • डी वॉर्ड, ग्रॅट रोड - ७९०

  • के पश्चिम, अंधेरी - ६६९

  • एन वॉर्ड, घाटकोपर - ३०६

  • पी साऊथ, गोरेगाव - २७५

  • पी उत्तर, मालाड - २३५

  • एम पश्चिम, चेंबूर - १८१

  • टी वॉर्ड, मुलुंड - १३५

  • एस वॉर्ड, भांडुप - ११५

logo
marathi.freepressjournal.in