११ हजारांहून अधिक आस्थापनांना नोटिसा ५५४ जणांना न्यायालयात खेचले; १० लाखांचा दंड वसूल

एडिस डासांची २६ हजारांहून अधिक उत्पत्ती स्थाने डेंग्यू, झिका विषाणुच्या अटकावासाठी विशेष मोहीम
११ हजारांहून अधिक आस्थापनांना नोटिसा ५५४ जणांना न्यायालयात खेचले; १० लाखांचा दंड वसूल

मुंबई : मुंबईत झिका विषाणूचा दुसरा रुग्ण आढळल्यानंतर मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. एडिस डासांमुळे डेंग्यूचा आणि झिका विषाणूचाही प्रसार होतो. त्यामुळे डेंग्यू, झिका विषाणूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेतला असता, तब्बल २६ हजार १३२ उत्पत्तीस्थाने आढळून आली. तर मलेरियाचा फैलाव होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या अॅनोफिलिस डासांची ३ हजार ९८२ उत्पत्तीस्थाने आढळून आल्याने तब्बल ११ हजार १७४ आस्थानपांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून सुमारे १० लाख १६ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. तर ५५४ जणांना कोर्टात खेचण्यात आले आहे.

दरम्यान, डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने विशेष मोहीम हाती घेतली असून बांधकाम, व्यावसायिक ठिकाणी धूम्रफवारणी करण्यात येत असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली. डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत ठरणाऱ्या एडिस डासांची उत्पत्तीस्थाने व मलेरियाचा फैलाव करणाऱ्या अॅनोफिलिस डासांच्या उत्पत्तीस्थानांकडे दुर्लक्ष करणे मुंबईकरांना चांगलेच महागात पडले.

एडिस डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेण्यासाठी तब्बल १८ लाख २९ हजार ७८७ घरांची झाडाझडती घेण्यात आली. तर १९ लाख ४९ हजार ४३९ कंटेनरची तपासणी करण्यात आली. या तपासणी मोहिमेत डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत एडिस डासांची तब्बल २६ हजार १३२ उत्पत्तीस्थाने आढळून आली. तर मलेरियाला कारणीभूत ठरणाऱ्या अॅनोफिलिस डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध घेण्यासाठी ३१ हजार ६३४ घरांची झाडाझडती घेतली. तर तपासणीत प्रजननस्त्रोतांची संख्या ८५ हजार ६६१ आढळून आली. यात ३,९८२ अॅनोफिलिस डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वारंवार सूचना किंवा आवाहन करूनही दुर्लक्ष करणाऱ्या ११ हजार १७४ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत तर ५५४ जणांना न्यायालयात खेचले आहे.

लोकसहभाग अपेक्षित

झिका विषाणूचे दोन रुग्ण आढळले असले तरी डेंग्यूचा प्रादूर्भाव वाढतच आहे. यासाठी आरोग्य व किटकनाशक विभागाने मोहीम हाती घेतली आहे. सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचा फैलाव होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे मुंबईकरांनी आपले घर व परिसर, कार्यालय परिसर स्वच्छ ठेवावा, जेणेकरून डासांची उत्पत्तीस्थाने निर्माणच होणार नाहीत, यासाठी मुंबईकरांची साथ असणे गरजेचे आहे.

- डॉ. दक्षा शहा, आरोग्य अधिकारी, मुंबई महापालिका

१ ते ३१ ऑगस्टपर्यंत अहवाल

मलेरिया

घरांची झाडाझडती - ३१,६३४

प्रजनन स्त्रोतांची संख्या - ८७,६६१

अॅनोफिलिस डासांची उत्पत्तीस्थाने - ३९८२

डेंग्यू

घरांची झाडाझडती - १८,२९,७८७

कंटेनरची तपासणी - १९,४९,४३९

एडिस डासांची उत्पत्तीस्थाने - २६,१३२

अशी केली कारवाई

जानेवारी ते जुलै

नोटीस बजावली - ११,१७४

न्यायालयात खेचले - ५५४

दंडात्मक कारवाई - १०,१६,५००

logo
marathi.freepressjournal.in