आरे कॉलनीतील आंदोलकांना सीआरपीसी अंतर्गत नोटिसा जारी

बेकायदेशीरपणे एकत्र येऊन कायद्याचे उल्लंघन केल्याचा इशारा देण्यात आल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले
आरे कॉलनीतील आंदोलकांना सीआरपीसी अंतर्गत नोटिसा जारी

मुंबई पोलिसांनी आरे कॉलनी येथे मेट्रो कारशेडच्या बांधकामाविरोधात निदर्शने करण्यासाठी जमलेल्या आंदोलकांना ‘सीआरपीसी’अंतर्गत नोटिसा बजावण्यास सुरुवात केली आहे.

गोरेगावच्या पश्चिम उपनगरातील आंदोलनस्थळी बेकायदेशीरपणे एकत्र येण्यास मनाई करत सीआरपीसी कलम १४९ अंतर्गत नोटिसा जारी करण्यात आल्या असल्याची माहिती समजते. गेल्या दोन दिवसांत तबरेझ सय्यद आणि जयेश भिसे या दोन आंदोलकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना बेकायदेशीरपणे एकत्र येऊन कायद्याचे उल्लंघन केल्याचा इशारा देण्यात आल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले.

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह शेकडो आंदोलक ‘सेव्ह आरे’ बॅनर घेऊन निदर्शने करत आहेत. अनेक फलकांवर नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी हस्तक्षेप करून शहरातील वनक्षेत्र वाचवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी बॅरिकेड्स लावले असून कारशेडच्या जागेजवळ कोणालाही जाण्याची परवानगी नसल्याच्या सूचना केल्या आहेत.

झोन १२चे पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे म्हणाले, “नेते, स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख आणि विविध गटांचे नेतृत्व करणारे लोक निदर्शने करण्यास परवानगी मागण्यासाठी पोलिसांकडे येत आहेत; मात्र कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही त्यांना सीआरपीसीच्या कलम १४९अंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत.” राज्यात सत्तांतर झाल्यांतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांजूरमार्गऐवजी आरे कॉलनीत मेट्रो कारशेड बांधण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in