
मुंबई : जखमी वन्यप्राण्यांसाठी अपंगालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता वन्यप्राण्यांसाठी निवारा केंद्र उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, गडचिरोली येथे वन्यप्राण्यांसाठी निवारा केंद्र उभारली जाणार आहेत. यासाठी ८ कोटी ६४ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला असून याबाबत महसूल व वन विभागाने गुरुवारी आदेश जारी केला आहे.
जखमी वन्यप्राण्यांच्या उपचारासाठी राज्यात उपचार केंद्र नाहीत. परिणामी अनेक वन्यजीव दगावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. राज्य शासनाने याची गंभीर दखल घेत, महत्त्वाच्या भागांत वन्यप्राण्यांसाठी अपंगालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. आता निवारा केंद्र उभारले जाणार आहेत. सुमारे ८ कोटी ६४ लाख ३४ हजार रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. अटी व शर्तींवर हा निधी वितरीत केला जाईल. अपंगालयासोबत निवारे केंद्र उभारताना, राष्ट्रीय प्राणी संग्रहालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग होणार नाही. तसेच वित्तीय अनियमितता होणार नाही, याची खबरदारी विभाग स्तरावर घेण्याच्या सूचना महसूल व वन विभागाने दिल्या आहेत.
वन्यप्राणी अपंगालयासाठी निधी
राज्य सरकारने अर्थसंकल्पात वन्यप्राण्यांसाठी अपंगालय उभारणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार अपंगालयासाठी जागा निश्चित खालीलप्रमाणे निधीची तरतूद केली होती.
कोल्हापूर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी २ कोटी,
नागपूरमधील उपवन संरक्षण (प्रा.) ५१ लाख,
अहमदनगर उपवन संरक्षण (प्रा.) ५ लाख,
गडचिरोली उपवन संरक्षणासाठी (प्रा.) ८ लाख ८० हजार,
ठाण्यातील उपवन संरक्षण (प्रा.) ६० लाख,
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासाठी १ कोटी ९५ लाख ५० हजार,
जुन्नर, माणिकडोह बिबट निवारा केंद्र ३ कोटी ४३ लाख २१ हजार