आता गल्लीबोळातील रस्त्यांची सफाई; सखोल स्वच्छतेसाठी लोकसहभागाची गरज -मंगलप्रभात लोढा

३ डिसेंबरपासून मुंबईत सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेला मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
आता गल्लीबोळातील रस्त्यांची सफाई; सखोल स्वच्छतेसाठी लोकसहभागाची गरज -मंगलप्रभात लोढा

मुंबई : ३ डिसेंबरपासून मुंबईत सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेला मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घ्यावा आणि या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

मुंबईतील मोठ्या रस्त्यांची व्यापक स्तरावर सूक्ष्म पद्धतीने स्वच्छता केली जात आहे, त्याचप्रमाणे गल्लीबोळातील रस्ते स्वच्छ करण्याची कार्यवाही यापुढे करण्यात येईल, असे प्रशासक व पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून पालिकेच्या विविध विभागांमध्ये सातत्याने सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. स्वच्छता मोहिमेअंतर्गत रविवारी गोवंडी स्थानक (पूर्व) ते गावदेवी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक (पांजरापोळ सर्कल), शनिमंदिर, गोवंडी पूर्व, नारायण गणेश आचार्य उद्यान (डायमंड गार्डन), स्वातंत्र्यसैनिक उद्यान (चिमणी गार्डन), चेंबूर आदी भागात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्वच्छता केल्यानंतर मान्यवरांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त (परिमंडळ ५) हर्षद काळे, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) (अतिरिक्त कार्यभार) संजोग कबरे, सहायक आयुक्त (एम पूर्व) अलका ससाणे व स्थानिक उपस्थित होते.

सखोल स्वच्छता मोहीम ही मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून आकारास आलेली अभिनव मोहीम आहे. शासन, प्रशासन व लोकसहभागातून ही मोहीम व्यापक चळवळ बनली आहे; मात्र, इतक्यावरच समाधानी न होता ही मोहीम अविरत आणि सक्षमपणे सुरू राहील, याकडे प्रशासनातील प्रत्येक घटकाने चोखपणे लक्ष द्यावे.

- डॉ. सुधाकर शिंदे, अतिरिक्त आयुक्त

स्थानिक व विद्यार्थ्यांचा सहभाग!

मुलुंड, गोवंडी, चेंबूर आदी भागांमध्ये राबविण्यात आलेल्या सखोल स्वच्छता मोहिमेत स्थानिक ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

logo
marathi.freepressjournal.in