खासगीकरणाची 'बेस्ट' धाव ! बेस्टमध्ये आता ड्राफ्ट्समनही कंत्राटी; अंतर्गत कामासाठी कंत्राटी पद्धत

कंत्राटी बसचालक व वाहक, विद्युत विभागात कंत्राटी कामगार मात्र आता बेस्ट उपक्रमाच्या कार्यालयीन कामकाजासाठी कंत्राटी कामगार घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे.
खासगीकरणाची 'बेस्ट' धाव ! बेस्टमध्ये आता ड्राफ्ट्समनही कंत्राटी; अंतर्गत कामासाठी कंत्राटी पद्धत

मुंबई : कंत्राटी बसचालक व वाहक, विद्युत विभागात कंत्राटी कामगार मात्र आता बेस्ट उपक्रमाच्या कार्यालयीन कामकाजासाठी कंत्राटी कामगार घेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. बस डेपो, बस स्थानक, बांधकाम करणे, विभाग कार्यालयात काही फेर रचना करणे, नकाशा तयार करणे यासाठी ड्राफ्ट्समन म्हणून कंत्राटी कामगार घेण्याचा निर्णय बेस्टने घेतला आहे. त्यामुळे बेस्ट उपक्रमाची खासगीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याची चर्चा बेस्ट उपक्रमातील कायमस्वरुपी कामगारांमध्ये सुरू आहे.

पाच हजार बसेस, ५० लाख प्रवासी अशी बेस्ट उपक्रमाची १० वर्षांपूर्वी ख्याती होती; मात्र हळुवार बेस्ट उपक्रमात कंत्राटी पद्धतीने पाय रोवण्यास सुरुवात केली. भाडेतत्त्वावरील बसेस, त्यानंतर कंत्राटी बसचालक व वाहक असा कंत्राटी पद्धतीचा बेस्टच्या परिवहन विभागात शिरकाव झाला. त्यानंतर बेस्ट उपक्रमाच्या विद्युत विभागातही कंत्राटी पद्धतीने कामगारांची एंट्री झाली. परिवहन विभागात कंत्राटी पद्धत, विद्युत विभागात कंत्राटी पद्धत यावरून बेस्ट उपक्रमावर चौफेर टीका झाली. मार्च २०२२ आधी होणाऱ्या बेस्ट समितीच्या बैठकीत कंत्राटी पद्धतीवरून बेस्ट प्रशासनाला टीकेला सामोरे जावे लागले; मात्र ही कंत्राटी पद्धत नाही, अशी ओरड अनेकदा बेस्ट उपक्रमाकडून करण्यात आली; मात्र आता, तर बेस्ट उपक्रमाच्या कार्यालयातच कंत्राटी पद्धतीची अंमलबजावणी होणार असल्याने बेस्ट उपक्रमाचे खासगीकरण, असा आरोप विरोधकांनी केला आहे.

ड्राफ्ट्समन कंत्राटी पद्धतीवर घेण्यासाठी बेस्ट उपक्रमाने निविदा मागवल्या आहेत. निविदा प्रक्रियेत पात्र कंत्राटदाराला अथवा कंपनीने अटीशर्तीनुसार ड्राफ्ट्समनचा पुरवठा करणे बंधनकारक असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

नवीन भरती नाही

बसेसचा नकाशा तयार करणे, बस डेपोंचा विकास करताना कशा प्रकारे डिझाईन बनवणे, बस स्थानकांची डिझाईन बनवणे, बसेस कशा प्रकारच्या असाव्यात यासाठी बेस्ट उपक्रमात कायमस्वरुपी ड्राफ्ट्समन कार्यरत होते; मात्र सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा वाढता आकडा आणि त्यात नवीन भरती नाही, यामुळे बेस्ट उपक्रमात कर्मचाऱ्यांची कमतरता निर्माण झाली. आर्थिक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत असताना कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे बेस्ट उपक्रमाचे चाक चिखलात रुतत चालले आहे.

सद्यस्थितीत बेस्ट उपक्रमातील कर्मचारी संख्या

परिवहन विभाग

-अधिकारी - २२६

-चालक वाहक व अन्य कर्मचारी - २०,२५९

विद्युत विभाग

-अधिकारी - ८८७

-कर्मचारी - ३,८९८

प्रशासकीय विभाग

-अधिकारी - २३५

-कर्मचारी - १,२३२

एकूण अधिकारी व कर्मचारी

२७,१४२

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in