नवी दिल्ली : केंद्रीय पोलीस दलांतील श्वान पथकांचे आता स्वदेशीकरण होणार असून परदेशी श्वानांच्या जागी स्वदेशी प्रजातीच्या श्वानांची नेमणूक लवकरच केली जाणार आहे. सध्या केंद्रीय पोलीस दलांत कार्यरत असलेल्या जर्मन शेफर्ड, बेल्जियम मॅलेनॉइस आदी श्वानांच्या जागी देशी मुधोळ हाऊंड, रामपूर हाऊंड, तिबेटन मॅस्टिफ आदी श्नानांच्या प्रजाती सामील करून घेतल्या जातील.
पोलीस आणि सेनादलांमध्ये विविध कामांसाठी श्वान पथके वापरली जातात. गुन्हेगारांचा आणि दहशतवाद्यांचा माग काढणे, त्यांचा पाठलाग करणे, लपवलेली स्फोटके शोधून काढणे, अमली पदार्थ शोधणे, गस्त घालणे अशी विविध कामे या प्रशिक्षित श्वानांकडून करवून घेतली जातात. इतकेच नव्हे, तर काही दहशतवादविरोधी कारवायांत सैनिकांच्या पुढे राहून श्वानांनी हल्ल्याचे नेतृत्व केले आहे आणि त्यात अंगावर गोळ्या झेलून देशासाठी बलिदान देत सैनिकांचे प्राणही वाचवले आहेत. जगभरातील सेनादलांत अशा कारवायांत बलिदान देणाऱ्या श्वानांना शौर्यपदकेही दिली जातात. सैनिक त्यांना जिवापाड जपतात. ते त्यांचे जिवाभावाचे सोबती बनलेले असतात.
मात्र, सध्या भारतीय सेनादले आणि केंद्रीय पोलीस दलांत कार्यरत असलेले बहुतांश श्वान परदेशी प्रजातींचे आहेत. त्यात जर्मन शेफर्ड, बेल्जियन मॅलेनॉइस, लॅब्रॅडॉर, कॉकर स्पॅनियल आदी प्रकारच्या श्वानांचा समावेश होतो. या श्वानांना भारतीय हवामान झेपेलच असे नाही. शिवाय त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांच्या खाण्या-पिण्याची स्वतंत्र व्यवस्था करावी लागले. त्याऐवजी भारतातीलच श्वानांच्या प्रजाती वापरण्यात याव्यात, असा विचार पुढे येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्याला पाठिंबा व्यक्त केला होता. त्यानंतर या प्रकल्पाला चालना मिळून विविध भारतीय श्वानांच्या प्रजातींचा शोध घेतला जाऊ लागला. त्यातून महाराष्ट्रातील मुधोळ हाऊंड, रामपूर हाऊंड, हिमाचली शेफर्ड, गड्डी, बकरवाल, तिबेटन मॅस्टिफ आदी प्रजातींची निवड करण्यात आली. या प्रजाती पिढ्यानपिढ्या भारतीय वातावरणात सरावलेल्या आहेत. तसेच त्या काटक, चपळ, बुद्धिमान आणि लढाऊ बाण्याच्या आहेत. त्या स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध आहेत. त्यांना सुरक्षा दलांसाठी प्रशिक्षित करणे सुलभ आणि फायद्याचे आहे. भारत-नेपाळ सीमेवर तैनात सशस्त्र सीमा बल (एसएसबी) आणि चीन सीमेवरील इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) या दलांसाठी मुधोळ हाऊंडच्या चाचण्याही घेऊन झाल्या आहेत. त्यामुळे लवकरच भारतीय सेनादले आणि केंद्रीय पोलीस दलांत स्वदेशी श्वानांच्या प्रजाती दिसणार आहेत.
पोलीस सर्व्हिस के९ पथके
सर्व केंद्रीय पोलीस दलांत सामील केले जाणारे श्वान पोलीस सर्व्हिस के९ (कॅनाइन) या विशेष पथकाचा भाग असतात. केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी), सशस्त्र सीमा बल (एसएसबी), नॅशनल सिक्युरिटी गार्ड्स (एनएसजी) आणि आसाम रायफल्स या दलांमध्ये प्रामुख्याने श्वान पथके वापरली जातात. या सर्व दलांत सध्या सुमारे ४००० श्वान कार्यरत आहेत. दरवर्षी ही दले ३०० पिले सामील करून घेतात आणि त्यांना प्रशिक्षण देतात. यापैकी सीआरपीएफकडे १५००, सीआयएसएफकडे ७०० आणि एनएसजीकडे १०० श्वान आहेत.