आता वीजबिल भरण्याची सुविधा चलो अॅप’ने केली सुरु
चलो अॅप’मुळे आता वीजबिल भरण्याची सुविधा बेस्ट उपक्रमाने उपलब्ध केली आहे. ‘चलो अॅप’चा १० लाख वीजग्राहकांना फायदा होणार असून, बुधवारपासून वीज ग्राहकांसाठी सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. दरम्यान, प्रवाशांसाठी ‘चलो अॅप’ची सुविधा उपलब्ध केल्यानंतर चार महिन्यांत तब्बल १५ लाख ग्राहकांनी पसंती दिल्याचे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.
प्रवाशांच्या वेळेची बचत, सुट्या पैशांची चणचण दूर करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने प्रवाशांसाठी ‘चलो अॅप’ सुविधा उपलब्ध केली आहे. जानेवारी महिन्यात सुरू केलेल्या ‘चलो अॅप’ला प्रवाशांचा प्रतिसाद पाहता वीजग्राहकांना वीजबिल भरण्यासाठी ‘चलो अॅप’ सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले.
बेस्ट उपक्रमाने ‘चलो अॅप’द्वारे ‘बेस्ट चलो स्मार्ट कार्ड’च्या रिचार्जची सुविधादेखील उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ‘चलो अॅप’च्या वापरकर्त्यांना आता त्यांचा कार्ड क्रमांक नोंद करून कार्ड टॉप अप करता येणार आहे. त्यानंतर ऑनलाइन रिचार्ज केलेले कार्ड बसवाहकाच्या मशीनद्वारे अॅक्टिव्हेट करता येईल, असेही चंद्र म्हणाले.