
स्वीटी भागवत / मुंबई
मेट्रो लाइन २बी आणि ९ च्या काही भागांवर अलीकडेच यशस्वी चाचणी घेतल्यानंतर, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आता मेट्रो लाइन ४ आणि ४ए च्या महत्त्वाच्या भागावर चाचणी सुरू करण्याच्या तयारीत आहे.
कॅडबरी ते गाईमुखदरम्यान १० किलोमीटरचा टप्पात लवकरच चाचणी घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या टप्प्यात एकूण १० स्थानके असणार आहेत ज्यामध्ये कॅडबरी, माजीवाडा, कपूरबावडी, मानपाडा, टिळुजी नि वाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गावनपाडा आणि गायमुख यांचा समावेश आहे - या स्थानकांमुळे हजारो प्रवाशांचा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होऊ शकतो. मेट्रो लाइन ४ आणि ४ए साठी नेमलेले डेपो अद्याप पूर्ण झालेले नसले, तरी एमएमआरडीएने चाचणी सुरू ठेवण्यासाठी एक तात्पुरती योजना तयार केली आहे.
मेट्रो लाइन ४ए ही लाईन ४ चा २.७ किलोमीटरचा विस्तार असून कासारवडवली ते गाईमुख या दरम्यान दोन अतिरिक्त स्थानकांसह ठाणे परिसरात मेट्रोचा पोहोच अधिक वाढवते.
मेट्रो ४ : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा
मेट्रो लाइन ४ ही वाडळा ते कासारवडवली असा ३२.३२ किमीचा संपूर्ण एलिव्हेटेड मार्ग असून त्यावर ३० स्थानके असतील. हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर पूर्व मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेचा कणा ठरणार आहे. हा मार्ग पूर्व द्रूतगती मार्ग, मध्य रेल्वे, मोनो रेल्वे आणि भविष्यातील मेट्रो लाईन २बी, ५ आणि ६ यांच्याशी सहज जोडला जाणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ ५०% ते ७५% पर्यंत कमी होण्याची अपेक्षा आहे. सध्या मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांसाठी मोठा बदल ठरणार आहे.