
मुंबईत कुठे गाडी पार्क करायची समस्या दूर होणार आहे. दहिसर येथून ते नरिमन पॉइंट येथे गाडी पार्किंगसाठी मोबाईल वर बुकींग करणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, पार्किंगसाठी आता मोबाईलवरून ऑनलाईन पेमेंट करता येणार आहे. त्यामुळे आता मुंबईत वाहन पार्किंगचे नो टेन्शन.
मुंबईतील वाढती वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, रस्त्यांच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग यामुळे मुंबईत पार्किंगची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहन पार्क करण्यासाठी जागा मिळत नसल्याने मुंबईत कुठे ही वाहन पार्क केली जातात. त्यामुळे पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी मोबाईल अॅप विकसित करण्यात येणार आहे. या मोबाईल अॅपवरून गाडीधारक मुंबईत कुठल्याही ठिकाणी वाहन पार्किंगची जागा बुक करू शकणार आहे.
मुंबई महापालिकेची वाहन स्थळे, एमएमआरडीए, मुंबई पोर्ट ट्रस्ट, खाजगी गृहनिर्माण सोसायटी, सरकारी व निमसरकारी संस्थेकडे असलेल्या जागेत विशेष वेळेत पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी अॅप विकसित केला जात असून, एकाच साॅफ्टवेअर इंटरफेस अंतर्गत आणले जाणार आहे. मुंबईतील पार्किंगची समस्या दूर करण्यासाठी मोबाईल अॅप महत्वपूर्ण ठरणार आहे. मुंबईत उपलब्ध वाहन पार्किंगची माहिती २४ बाय ७ मिळणार आहे. तसेच वाहन पार्किंगसाठी फक्त ऑनलाईन पेमेंट करण्याची संधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.