मुंबई : परळ येथील केईएम, टाटा, वाडिया व गांधी रुग्णालयात आता मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने या रुग्णालयात मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय दूर होईल, असे विधीमंडळ गटनेते अजय चौधरी म्हणाले.
शिवडी विधानसभा विभागात केईएम, वाडिया, टाटा, गांधी अशी शासकीय रुग्णालये आहेत. या ठिकाणी रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक येत असतात. अशावेळी नातेवाईकांना काही अडचणी आल्यास, संबंधित व्यक्तीशी संपर्क साधण्यासाठी मोबाईल उपयुक्त आहे. मात्र रुग्णालयात मोबाईल चार्जिंगची सुविधा उपलब्ध नसल्याने नातेवाईकांना खासगी ठिकाणी पैसै मोजून मोबाईल चार्ज करावा लागतो. याची गंभीर दखल घेऊन शिवसेना आमदार विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांनी शिवडी विधानसभेतील प्रत्येक रुग्णालयात मोबाईल चार्जिंग पॉइंट उभारण्याचा निर्णय घेतला. त्याचे लोकार्पण उपनेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक आमदार दगडूदादा सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळेस माजी नगरसेवक सचिन पडवळ, अनिल कोकीळ आणि शाखाप्रमुख हनुमंत हिंदोळे व मिनार नाटळकर उपस्थित होते.